मुंबई : कोरोनाविरूद्धच्या लढ्यात आपण धोक्याच्या वळणावर येऊन पोहचलो आहोत. आता आणखी सावध राहण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन करतानाच मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आणि वारंवार हात धुण्याची त्रिसूत्री कसोशीने पाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील नागरिकांना संबोधित करताना केले. गर्दी टाळण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, वाढत्या संसर्गामुळे आता लाॅकडाऊनच्या पुन्हा दिशेने जायचे का, याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. आपल्या हालचालींवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, याबाबत प्रश्न अद्याप कायम आहेत. शाळा उघडू शकू की नाही, हे अद्याप सांगता येणार नाही. अद्याप कोणतेही औषध आले नसल्याने काळजी घेणे इतकेच आपल्या हाती आहे. डिसेंबरमध्ये लस आली तरी राज्यातील साडेबारा कोटी जनतेपर्यंत ती पोहचवण्याचे आव्हान कायम आहे. लस साठवणे, त्याचे वितरण हे प्रश्न आहेतच. शिवाय, काही लसी दोन वेळा द्यावा लागणार आहेत. म्हणजे २५ कोटीवेळा लस द्यावी लागणार आहे.