सीमा महांगडे
मुंबई : ‘‘ही मुलगी शिकूच शकणार नाही...’’ डॉक्टरांनी असे सांगितल्यावर तिच्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली, त्यांना काय करावे ते सुचेना. पण, डाऊन सिंड्रोम हा आजार असलेल्या आपल्या मुलीला जिद्दीने शिकवायचेच असे त्यांनी ठरविले. आज तीच मुलगी ‘सुभाषित माला’ या उपक्रमांतून विविध शाळांतील विद्यार्थ्यांना संस्कृतचे धडे देत आहे. विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतविषयी आवड निर्माण करून, त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी डाऊन सिंड्रोम असलेली ऋचा शेरे हिने आत्तापर्यंत ६५० हून अधिक विद्यार्थ्यांचे सुभाषित मालाचे वर्ग घेतले आहेत. ऋचाची यशस्वी धडपड इथेच थांबणार नसून ती पुढेही स्वत:चे प्रयत्न विविध शिकविण्याच्या माध्यमातून चालूच ठेवणार आहे.
सुनीता आणि सुनील शेरे या दाम्पत्याची एकुलती असलेल्या २१ दिवसांच्या ऋचाला ट्रायसमी २१, डाऊन सिंड्रोम असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. जनुकीय दोषांतून होणारा हा आजार असलेल्या मुलांमध्ये बुद्ध्यंक कमी असतो, असे म्हणतात. मात्र अडचणींवर जिद्दीने मात करीत शेरे यांनी मुलीला सर्वसामान्य मुलांच्या शाळेत शिक्षण द्यायचे ठरविले. ऋचाला लहानपासूनच वाचनाची आवडही होती. दहावीच्या वर्षात ‘लर्निंग डिसएबल्ड’ या प्रकारात मोडताना तिला अडचणी आल्याने महापालिका शिक्षण विभाग तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द मेंटली हॅण्डिकॅप्ड या संस्थेनेही तिचा ‘आयक्यू रिपोर्ट’ काढून बोर्डाला तसे शिफारसपत्र दिले आणि ‘डाऊन सिंड्रोम’ हा आजार असूनही दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणारी ऋचा त्या वेळी एकमेव मुलगी ठरली.
ऋचाला या परीक्षेत ५८ टक्के मार्क मिळाले होते. एसएनडीटी महिला विद्यापीठातून संस्कृत भाषेतून ऋचाने आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ती आपला टीचर ट्रेनिंग कोर्स पूर्ण करीत आहे.