मुंबई: अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती अध्यक्ष व झुंजार मच्छिमार नेते दामोदर तांडेल(72) यांचे आज निधन झाले. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.दरम्यान उपचारा दरम्यान त्यांचे आज दुपारी 12.30 वाजता निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी पूनम, दोन मुले, दोन सुना व दोन नातवंडे असा परिवार आहे. २००२ साली ते महाराष्ट्र मत्स्यउद्योग महामंडळाचे राष्ट्रवादी मधून उपाध्यक्ष झाले होते. मच्छिमारांचे प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यासाठी आमदार बनून मंत्री होण्याचे स्वप्न मात्र त्यांचे अधुरे राहीले.
आज रात्री त्यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार येणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्या कफपरेड येथील निवासस्थानी पार्थिवाचे मुंबई, ठाणे,पालघर येथील अनेक मच्छिमार कार्यकर्ते व त्यांच्या चाहत्यांनी व राजकीय नेत्यांनी दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. मु. पो. केळवे, सातपाटी, पालघर हे त्यांच मुळगांव होते. मुंबईत कफ परेड मच्छिमार नगर येथे ते रहात होते. हिंदुस्तान लिव्हर कंपनीतून निवृत्त झाल्यावर त्यांनी त्यांचे आयुष्य मच्छिमारांसाठी वाहिले. कंपनीत कामगार युनियनचे अध्यक्ष होते. मच्छिमारांप्रमाणे कामगारांसाठी ते कंपनीत लढत राहिले.
एक धडाडीचा मच्छिमार समाजाचा शासन दरबारी आवाज ऊठविणारा ख्यातनाम कार्यकर्ता काळाच्या पडद्या आड गेला. त्यांनी शासनाच्या एलईडी फिशिंग धोरणाविरुद्ध कोर्टात उभारलेला लढ्याच्या कार्याच्या स्मृती समाजाच्या चिरकाल स्मरणात राहतील असा शब्दात महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो व सरचिटणीस किरण कोळी यांनी समितीच्या तमाम मच्छिमारांतर्फे श्रद्धांजली वाहिली. दामोदर तांडेल यांच्या निधनामुळे मच्छिमार समाजाचे मोठे नुकसान झाले असून एक झुंजार व लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने त्यांच्या सारखा लढवय्या नेता होणे कठीण आहे अश्या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई विभागाचे मच्छिमार सेलचे अध्यक्ष प्रदीप टपके यांनी श्रद्धांजली वाहिली.
मच्छीमारांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर धडक मोर्चा व आंदोलन करून सरकारला जाब विचारणारा लढवय्या नेता दामोदर तांडेल यांचे कोरोनामुळे निधन झाले हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.मच्छीमार समाजावर होणारा अन्याय असो अथवा एखाद्या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमार बांधवांचा ज्वलंत प्रश्न असो,या प्रकरणी शासन दरबारी सतत पाठपुरावा करून आवाज उठविणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती.आज त्यांचे निधन झाल्याने मच्छीमार समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे.
दामोदर तांडेल यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर अनेक धडक मोर्चे निघाले.पारंपारीक मासेमारी व्यवसाय नष्ट करणाऱ्या भांडवलदारांच्या पर्ससीन जाळीवर बंदी आणण्यासाठी सातत्याने आवाज उठवला,कोकणातील ३७५ किनारपट्टी गावातील मच्छीमारांच्या वहिवाटीच्या जमीनी सात-बारा उताऱ्यावर आणण्यासाठी,चित्रा खलिजा तेलवाहू जहाजाच्या टक्करीमुळे मासेमार महिला विक्रेत्यांच्या झालेले नुकसानीची भरपाई म्हणून १५हजार कोळी महिला विक्रेत्यांना प्रत्येकी १०हजार मिळायलाच हवे व छोट्या मच्छीमारांना ८कोटी रूपये नुकसान भरपाई मिळावी , मुंबईतील कोळीवाडे व मच्छीमार वसाहतीना ३चटई क्षेत्र व ३३फुटाच्या आर.सी.सी.च्या बांधकामांना परवानगी मिळण्यासाठी अथक पाठपुरावा केला होता अशी माहिती आजचा तटरक्षकचे संपादक प्रवीण दवणे यांनी दिली.