Join us

लढण्यानेच दिले जगण्याचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 4:05 AM

कोरोना काळात एकही दिवस सुट्टी न घेता रुग्णसेवा सुरू होती. रुग्णांचे आकडे वाढत जात असताना स्वत:च्या सुरक्षेचीही काळजी घेत ...

कोरोना काळात एकही दिवस सुट्टी न घेता रुग्णसेवा सुरू होती. रुग्णांचे आकडे वाढत जात असताना स्वत:च्या सुरक्षेचीही काळजी घेत काम सुरू होते. मात्र तरीही १६ ऑगस्ट रोजी मला ताप आला आणि मग त्यानंतरच्या अनुभवातून - लढण्यातून खऱ्या अर्थाने जगण्याचे बळ मिळाले.

......................................

पालिकेच्या रुग्णालयातून थेट कोविड केंद्रात काम करण्यासाठी नियुक्ती झाल्यानंतर थोडी धाकधूक होती, मात्र धीर एकवटून या आव्हानाला सामोरे जायचे ठरवले. सुरुवातीला पीपीई किटमध्ये काम करताना अक्षरशः जीव जायचा, म्हणजे नेमकी मानसिक-शारीरिक अवस्था काय असायची हे शब्दांतही सांगता येणार नाही. पण, ते आव्हानही आता सुकर झाले आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्ण आपल्या कुटुंबापासून पूर्णपणे विलगीकरणात असायचा, त्यामुळे कुटुंब आणि रुग्ण यांच्यातील दुवा म्हणूनही आम्हाला भूमिका बजावावी लागली.

या दोन्ही घटकांमध्ये दुवा म्हणून काम करताना आलेल्या अनुभवाने रोज जगण्याची ऊर्मी वाढतेय. रुग्णाच्या चिंतेने कुटुंबाची होणारी घालमेल आणि रुग्णाच्या प्रकृतीविषयी कुटुंबाशी संवाद या दोन्हीमध्ये सकारात्मकता टिकवून ठेवणे, संयम बाळगणे आणि कामात सातत्य ठेवणे यातून खूप काही शिकायला मिळाले. कोरोनापूर्वी आरोग्यसेवा आणि कोरोनादरम्यान आरोग्यसेवा यात जमीन - आस्मानाचे अंतर आहे, हे त्या वेळी लक्षात आले. कोरोनाच्या काळात सेवा देताना अनेकदा नैराश्यही वाट्याला आले, पण रुग्ण-कुटुंबीयांमध्ये आयुष्याविषयी असलेला सकारात्मक दृष्टिकोन मला काम करताना ऊर्जा द्यायचा. किंबहुना यामुळे ताकद वाढत गेली आणि आता कोरोनापेक्षा अन्य आव्हाने आली तर आव्हान पेलायची तयारी आहे.

कोरोना काळात सेवा देताना काही खेद कायम मनात राहिले, कोरोना काळात पहिल्या दिवसापासून परिचारिका पूर्ण क्षमतेने अपुरी साधन-सामग्री असतानाही सेवा देत आहेत. ही सेवा देताना अनेक परिचारिका कोरोनाने बाधित झाल्या. मात्र बरे झाल्यानंतर पुन्हा सेवेत दाखल झाल्या. त्यामुळे परिचारिकांसह इतर कर्मचाऱ्यांनाही ‘प्रोत्साहन भत्ता’ देण्याची गरज आहे. आरोग्यसेवा क्षेत्रातील डॉक्टरांनंतरचा प्रमुख घटक म्हणून परिचारिकांचा विचार व्हायला हवा.

- नीलिमा धोत्रे

(लेखिका परिचारिका असून, वांद्रे - कुर्ला संकुल येथील कोरोना केंद्रात रुग्णसेवा करीत आहेत.)