मुंबई : एकीकडे सरकार मराठा समाजाच्या बाजूने उभे राहात आहे. परंतु, सरकारमधील मंत्री छगन भुजबळ मराठा विरुध्द ओबीसी, मराठा विरुद्ध नाभिक समाज असे जातीय तेढ निर्माण करत आहेत. जातीजातीत तेढ निर्माण करणाऱ्या कलमांतर्गत भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जाट, मराठा, गुर्जर, पाटीदार संयुक्त कृती समितीने केली आहे. संयुक्त कृती समितीच्या वतीने मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी छगन भुजबळ हे दोन जातीत तेढ निर्माण करत असूनही सरकार त्यांची हकालपट्टी करत नाही, याचा अर्थ सरकारचे त्यांना समर्थन आहे का, असा सवाल केला. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत, अखिल भारतीय जाट महासभेचे जनरल सेक्रेटरी युद्धवीर सिंग, पाटीदार संघर्ष समितीचे मनोज पणारा, राजस्थान गुर्जर महासभेचे हिम्मतसिंग गुजर, वीर गुर्जर महासभेचे सुभाष चौधरी, परविंदर आव्हाना, नंदरुप चौधरी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष संतोष नानवटे, सरचिटणीस संभाजी दहातोंडे, प्रवक्ता श्रीरंग बरगे आदी उपस्थित होते.