मुंबई - आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून पुढील महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. यंदाचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष असून लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकांचाही बिगुल वाजणार आहे. त्यामुळे, आमदार, खासदारही लोकांमध्ये जाऊन जवळीस साधत आहेत. त्यातच, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी एका शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी, मला आमदार करण्यासाठी २ दिवस जेवण न करण्याचं म्हटलं. त्यावरुन, आता आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत.
आमदार रोहित पवार यांनी संतोष बांगर यांचा शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतानाचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाकडून मतदान जागृती करण्यात येते. त्यासाठी, विविध उपक्रमांतून नवयुवकांना आणि मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं जातं. तसेच, मतदान प्रक्रियेत उमेदवारांनाही काही आचारसंहिता घालून देण्यात आलेली आहे. त्यानुसार, आचारसंहितेचं उल्लंघन करण्याचंही आयोगाकडून बजावलं जातं. त्यामध्ये, शाळकरी मुलांचा वापर प्रचारासाठी केला जाऊ नये, असेही सांगण्यात येते. मात्र, आमदार संतोष बांगर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून ते शाळेतील मुलांचा वापर स्वत:च्या प्रचारासाठी करत असल्याचं दिसून येत आहे.
संतोष बांगर यांना मतदान करण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दोन दिवस जेवायचं नाही, म्हणजे हे काय महात्मा आहेत का? यांनी लहान मुलांच्या शिक्षणासाठी मतदारसंघात काय दिवे लावले?, असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे. तसेच, लहान मुलांचा राजकारणासाठी वापर करणं हा गुन्हा असून याबद्दल या आमदार महाशयांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.