मुंबई – एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी औरंगाबादेत औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. त्यावरून महाराष्ट्रात नवा वाद निर्माण झाला आहे. यावरून भाजपा-मनसेसह सत्ताधारी पक्षाकडूनही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा आमदार नितेश राणेपाठोपाठ मोहित कंबोज यांनीही शिवसेनेला कोंडीत पकडत तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला सांगा, १५ मिनिटांत औवेसीला उत्तर देऊ असं म्हटलं आहे.
भाजपा नेते मोहित कंबोज म्हणाले की, औवेसी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेऊन महाराष्ट्रात चिथावणीखोर भाषण करतो. शेरगील उस्मानी हिंदुंवर टीप्पणी करतो. त्यांच्यावर कारवाई होत नाही परंतु हनुमान चालीसा लावू म्हणणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात. राजद्रोहाची कलमं लावली जातात. १ हजार मस्जिदींवर भोंगे लावण्याची परवानगी दिली. वाह रे वाह ठाकरे सरकार असा टोला लगावला आहे.
तसेच ठाकरे सरकार सत्तेसाठी लाचार झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एक कुत्रा येतो आणि औरंगजेबाच्या समाधीचं दर्शन घेऊन हिंदुना जाहिरपणे ललकारतो. त्यावर कसलीही कारवाई होत नाही कसलाही गुन्हा दाखल होत नाही. एकीकडे हनुमान चालिसा पठण केलं तर गुन्हे दाखल होतात. खुर्चीसाठी विचारधारा सोडली बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं आणि मुंबई शहरात सगळीकडे हिंदुत्वाची बॅनरबाजी कसली करता? तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला सांगा १५ मिनिटांत ओवैसीला उत्तर देऊ असा इशारा मोहित कंबोज यांनी दिला आहे.
तुझं थगडंही तिथेच बांधणार – मनसे
अकबरुद्दीन औवेसी यांनी औंरगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर मनसेनेही आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. एक दिवस त्या औरंगजेबच्या थडग्या शेजारीच तुझ थडगं आम्ही बांधल्याशिवाय शांत बसणार नाही. हा हैदराबादचा कुत्रा आहे, त्याच्या अंगात पाकिस्तानाच रक्त आहे. अशा शब्दात मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
महाराष्ट्राला अशांत करण्याचं राजकारण - शिवसेना
"संभाजीनगरला वारंवार यायचं आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे हे महाराष्ट्राला अशांत करण्याचं राजकारण ओवेसी बंधू करत आहेत. महाराष्ट्रावर चाल करणारा २५ वर्ष रडत राहीला. त्याला कधीच यश मिळालं नाही. औरंगजेब काही साधू संत नव्हता. इतिहास तुम्हाला सगळं सांगेल. औरंगजेबाच्या कबरीवर महाराष्ट्राला आव्हान देण्याची गोष्ट तुम्ही करत असाल तर ते आव्हान आम्ही स्वीकारलं आहे. जे औरंगजेबाचं झालं तेच त्याच्या भक्तांचंही होईल" असा घणाघात संजय राऊत यांनी केला.