मुंबई : क्रिकेटर पृथ्वी शॉ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी सपना गिल हिने केलेल्या फौजदारी तक्रारीवरील निकाल अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने राखून ठेवला. तसेच शॉने हल्ला व विनयभंग केल्याची तक्रार करूनही गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलिसांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी सपनाने केली आहे. शॉ व त्याच्या मित्रांनी सपनाचा विनयभंग केला आणि तिला मारहाण केली. तिच्या उजव्या हातावर व छातीवर जखमा झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे, असा युक्तिवाद सपनाचे वकील अली काशीफ खान यांनी दंडाधिकाऱ्यांपुढे केला. पृथ्वी शॉला मारहाण केल्याप्रकरणी सपनाला फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली. एअरपोर्ट पोलिसांनी सपनाची तक्रार नोंदविण्यास नकार दिल्याने त्यांनी कर्तव्यात कसूर केला आहे. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी खान यांनी केली. शॉ, त्याचा मित्र आशिष यादव व एअरपोर्ट पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सपनाने अर्जातून केली आहे. न्यायालयाने खान यांचे म्हणणे ऐकून घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करायचा की नाही, याबाबत २६ मे रोजी निकाल देऊ, असे म्हटले.
Prithvi Shaw: ‘पृथ्वी शॉविरोधात गुन्हा दाखल करा’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 12:51 PM