Join us

तानाजी सावंतांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; सुषमा अंधारे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 4:46 PM

मृत्यूच्या तांडवामुळे खडबडून जागे झालेल्या राज्य शासनाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले.

मुंबई - नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली. त्यानंतर मंगळवारी अत्यवस्थ असलेल्या आणखी 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 8  बालकांचा समावेश आहे. दोन दिवसांत तब्बल 35 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अत्यवस्थ असलेले 36 शिशुंसह 59 रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यानंतर, छत्रपती संभाजीनगर, नागपूरमधील सरकारी रुग्णलयांतील भोंगळ कारभार आणि जनतेची ससेहोलपट पुढे आली. यावरुन, विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. त्यातच, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी परखडपणे भूमिका मांडली.  

मृत्यूच्या तांडवामुळे खडबडून जागे झालेल्या राज्य शासनाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. राज्यातील सरकारी रुग्णालयामध्ये मृत्यूच्या अशा घटना आता समोर येत आहेत. नांदेडनंतर आता नागपूरमध्ये देखील काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिल्ली वाऱ्या करायला वेळ आहे, पण या रुग्णालयांना भेट देण्यासाठी वेळ नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. आता, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही आरोग्यमंत्री व वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

हे बळी शासनाने घेतलेले आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांवरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. कारण, तुमच्या हलगर्जीपणामुळेच हे बळी गेले आहेत, असे म्हणत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नांदेडसह राज्यातील शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यु तांडवावर आक्रमकपणे भूमिका मांडली. 

आनंदाच्या शिध्याचा नाटक करता 

सरकार आनंदाच्या शिध्याचं नाटक करतेय, पण माणसं कशी जगतील याचा विचार करत नाही. श्री सदस्यांच्या मृत्यूवेळीही असंच केलं. पुरस्कारासाठी १४-१५ कोटी रुपयांचा खर्च केला. मात्र, त्यावेळी, तेथे येणाऱ्या श्री सदस्यांच्या आरोग्याशी तुम्ही खेळलात. त्यांच्या आरोग्याची काळजी तुम्ही घेतलीच नाही. तिथेही पुरेशा रुग्णवाहिका ठेवल्या नाहीत. पुरेशी आरोग्यव्यवस्था ठेवली नाही. म्हणूनच तिथे माणसं मेली, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. 

आरोग्यव्यवस्था पूर्ववत करा

सरकारने तातडीने व्हेंटीटेलवर गेलेली महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था पूर्ववत करावी. तुमच्या संसारात काय चाललंय ते दाराच्या आत मिटवा आणि बाहेर दिवानखान्यात येताना आम्हाला उत्तर द्या, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

संजय राऊत यांनाही केला हल्लाबोल

"महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरू आहे, असे असताना राज्याचे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना त्यांची चिंता नाही. हे राजकारणात अडकलेले आहेत. कोणाला पालकमंत्री, कोणाला खाते बदलून...अशातच ते अडकले आहेत. नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड या ठिकाणी लोकांचा आक्रोश पाहा… याकडे सरकारचे लक्ष नाही. ह्यांचा काय सत्कार करायचा का? ", असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे. तसेच, महाराष्ट्र हे आजारी राज्य होत चालले आहे. राजकीय दृष्ट्या महाराष्ट्र आजारी झाला आहे. या लोकांनी महाराष्ट्राला आजारी राज्य बनवले, हे बरोबर नाही, असे संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :सुषमा अंधारेतानाजी सावंतहॉस्पिटलआरोग्यमंत्री