परप्रांतीयांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:08 AM2021-09-15T04:08:33+5:302021-09-15T04:08:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतीयांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतीयांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करत यापुढे परप्रांतीय कुठून येतात, कुठे जातात, यांचा हिशोब ठेवावा लागेल, असे वक्तव्य केले; पण त्यांनी या वक्तव्यातून जणू परप्रांतीय नागरिकच बलात्कारी व गुन्हेगार असल्याचे चित्र निर्माण करून त्यांनी समाजात तेढ निर्माण केले आहे. त्यामुळे कलम १५३- अ अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, याला प्रसिद्धी देणाऱ्या सामना वर्तमानपत्राच्या संपादिका रश्मी ठाकरे व सामन्याचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार भाजपा मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी समता नगर पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी काम करण्याचे सोडून ठाकरे सरकार वसुली करण्यात मग्न आहे. राज्यात दिवसागणिक बलात्कार व महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ होत असताना व ठाकरे सरकारमधील मंत्री व नेतेच बलात्कारी असतानासुद्धा मुख्यमंत्री मात्र परप्रांतीय नागरिकांना लक्ष करीत आहेत. शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड, नगरसेवक नामदेव भगत, शिवसेनेचे माजी आमदार दिलीप माने, नालासोपाऱ्याचा शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांच्यावर महिलांवरील अत्याचाराचे आरोप झाले आहेत, हे सर्व शिवसेनेचे नेते परप्रांतीय आहेत का? असा सवाल त्यांनी केला, तसेच पुढील चार दिवसांच्या आत मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारासुद्धा त्यांनी दिला आहे.