'फडणवीसांना धमकी देणाऱ्या संजय राऊतांवरही गुन्हा दाखल करा'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 11:02 AM2022-02-10T11:02:08+5:302022-02-10T11:03:29+5:30
माझ्यावर राजकीय सूडबुद्धीने गुन्हा दाखल केला असून संजय राऊतांवरही गुन्हा दाखल करायला पाहिजे, असे राणा यांनी म्हटलंय.
मुंबई - अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गात सांडपाणी साचत असल्याच्या माहितीवरुन पाहणीसाठी आलेले महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर तीन महिलांनी अचानक धाव घेत शाई फेकली. कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या वाहनांचा टायर फोडण्याचा प्रयत्न केला आणि पेचकचने त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्नदेखील केला. याप्रकरणी आता आमदाररवी राणा यांच्यावर 307 कलमान्वये हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, माझ्यावर राजकीय सूडबुद्धीने गुन्हा दाखल केला असून संजय राऊतांवरही गुन्हा दाखल करायला पाहिजे, असे राणा यांनी म्हटलंय.
आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपुरात जाता येणार आहे, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला होता. आमदाररवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राणा यांनी राऊतांच्या या विधानाचा उल्लेख करत त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. माझ्या कार्यकर्त्यांनी शाई फेकून निषेध केला तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल करतात. मग, संजय राऊतांवरही गुन्हा दाखल करायला पाहिजे. राज्यात सूड बुद्धीने राजकारण केलं जातंय, सूडबुद्धीने माझ्यावर हा गुन्हा दाखल झालाय, असेही राणा यांनी म्हटले आहे.
मी दिल्लीत असताना गुन्हा दाखल
आमदार रवी राणा म्हणाले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी दिल्लीत होतो. मीही माध्यमातून या बातम्या वाचल्या आणि पाहिल्या आहेत. शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यामुळे त्यांनी आयुक्तांच्या अंगावर शाईफेक केल्याचं राणा यांनी म्हटले. तसेच, मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पालकमंत्री यांच्यावरील दबावामुळेच आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला काही पोलिस व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. राजकीय सूडबुद्धीने मला अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचेही आमदार राणा यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे एका सुईचादेखील कुठे पुरावा मिळत नाही, पण 307 चा खोटा गुन्हा दाखल केल्याचं राणा यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.
काय म्हणाल होते राऊत
शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील नेत्यांच्या होत असलेल्या चौकशांवरुन केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. ही मुंबई आहे. या मुंबईचा दादा शिवसेना आहे. आता तुम्ही शिवसेनेची दादागिरी पाहाच, अशा शब्दात राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं. तसेच देवेंद्र फडणवीसांना आवाहन करतोय. त्यांना माहिती आहे मला काय सांगायचे आहे ते. आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपुरात जाता येणार आहे, असा इशाराच संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. त्यानंतर, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी संजय राऊतांच्या या विधानावर प्रहार केलाय.