मुंबई : अंधेरी येथील कामगार रूग्णालयात लागलेल्या आगीस संबंधित विभागाचे व्यवस्थापन जबाबदार आहे. त्यामुळे ईएसआयसी कार्पोरेशनच्या डायरेक्टर जनरलविरोधात कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.
कामगार रुग्णालयातील आगीत आठ जणांना जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना मलिक म्हणाले की, भोपाळमधील गॅस दुर्घटनेनंतर १९८४ साली देशात कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यानुसार कुठल्याही आस्थापनेत अशाप्रकारची घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित खात्याच्या प्रमुखावर टाकण्यात आली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जळीतकांडाची चौकशी करण्याचे विधान करत आहेत. परंतु कायद्यानुसार अशा चौकशीची गरज नाही. थेट गुन्हा दाखल करुन संबंधित खात्याच्या डायरेक्टर जनरल यांना अटक करावी अशा प्रकारची तरतूद कायद्यात आहे. असे असतानाही कारवाई होत नसेल तर सरकार संबंधित लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय निर्माण होतो, असेही मलिक म्हणाले.दहा जणांची प्रकृती गंभीरकुपर रुग्णालयात २२, जोगेश्वरीत ट्रॉमा रुग्णालयात २३, तर होली स्पिरीट रुग्णालयात ४५ जखमींवर उपचार सुरू आहेत. सेव्हन हिल्स रुग्णालयातील ६५ पैकी दहा जणांची प्रकृती गंभीर आहे. पवईतील हिरानंदानी रुग्णालयात तिघांवर उपचार सुरू आहेत. एकूण १७७ जण जखमी झाले आहेत. त्यात अग्निशमन दलाचे तीन जवान आहेत.‘मंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’ई.एस.आय.सी. रुग्णालयामधील अधिकारी व कर्मचारी यांच्या रिक्त जागा व अपेक्षित सुविधा याबाबत सिटू कामगार संघटनेने २०१६ ते २०१८ या काळात ईएसआयसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. मात्र, सुधारणेअभावी कामगारांचा बळी जात आहे. ईएसआयसीकडे ७० हजार कोटींपेक्षा जास्त राखीव निधी आहे. ईएसआयसीकडे २०१७ मध्ये १४ हजार कोटी जमा झाले. त्यापैकी ७ हजार कोटींपेक्षा कमी रुपये वैद्यकीय सुविधांवर खर्च झाले. या वेतनातून सक्षम यंत्रणा उभारता आली असती. मात्र, तसे न करणाºया केंद्रीय व राज्यातील मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी सी.आय.टी. यू.ने केली आहे.