फडणवीसांसह भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करा
मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांची गृहमंत्र्यांकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रात रेमडेसिविर इंजेक्शन्सचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. या इंजेक्शनच्या निर्यातीला तसेच खासगी व्यक्तीला विकण्यास बंदी असताना ब्रुक्स फार्मा कंपनीने चार कोटी ७५ लाखांचे इंजेक्शन भाजप नेते देवेंद्र फडणवीसांना विकल्याचा आरोप करतानाच सर्व प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ब्रुक्स कंपनीला १६ एप्रिलला पत्र पाठवून इंजेक्शन्सचा साठा राज्याला देण्याचे पत्र सरकारने दिले होते. ब्रुक्स कंपनीचे लोक भाजपशी संबंधित आहेत. कंपनीचे मालक राजेश डोकनिया यांना बीकेसी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी पोलिसांना ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, पराग अळवणी यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांवर दबाव टाकून काळाबाजार करणाऱ्या व्यक्तींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. काळाबाजार करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची त्वरित सखोल चौकशी करून त्याचा अहवाल महाराष्ट्रासमोर ठेवण्याची मागणी भाई जगताप यांनी निवेदनात केली.