Join us

कंगणा विरोधात निर्मात्याकडून तक्रार दाखल

By admin | Published: June 10, 2017 12:16 PM

सिनेमाच्या लेखकाने कंगणावर कथा चोरीचा आरोप केल्यानंतर आता निर्मात्याने कंगणाविरोधात थेट फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 10- अभिनेत्री कंगणा राणावत  सध्या तीच्या सिनेमांमधील भूमिकांमुळे चर्चेत राहण्याऐवजी तीच्या वैयक्तिक आयुष्यात सुरू असलेल्या वादामुळे जास्त चर्चेत आहे. आता आणखी एक नवा वाद तीने ओढवून घेतला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर बनणाऱ्या  "मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांशी" या सिनेमाने कंगणाला नव्या संकटात टाकलं आहे. सिनेमाच्या लेखकाने कंगणावर कथा चोरीचा आरोप केल्यानंतर आता निर्मात्याने कंगणाविरोधात थेट फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
 
"कंगनासोबत या सिनेमाविषयी आम्ही वर्षभर चर्चा करत होतो. सिनेमाच्या कथेसह अनेक महत्त्वाच्या गोष्टी कंगणाला माहिती आहेत. पण, कंगणा आमचीच कथा घेऊन दुसऱ्यासोबत या सिनेमावर काम करते आहे. ही गोष्ट जेव्हा समजली तेव्हा धक्का बसला. कंगनाने आमची कथा चोरली आणि ही सहन करण्यासाठी गोष्ट नाही", असा सिनेमाचे निर्माते केतन मेहता म्हणाले आहेत. मुंबई मिरर या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. 
 
केतन मेहता यांनी दाखल केलेल्या तक्रारीत कंगणाच्या या कृत्यामुळे ९ कोटींचं नुकसान झाल्याचं नमूद केलं आहे. याशिवाय हा प्रोजेक्ट सोडण्याआधीच कंगणाने दुसरीकडे याच कथेवर शूटिंगसुद्धा सुरु केलं आहे, असा आरोपही मेहता यांनी केला आहे. 
 
दरम्यान, कंगणाने निर्माते केतन मेहता यांचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. दोन्ही सिनेमांमध्ये खूप फरक असल्याचं कंगनाचं म्हणणं आहे. कंगणावर  खोटे आणि निराधार आरोप केले जात आहेत, पण याचा तिच्यावर काहीच परिणाम होणार नाही, असं कंगणाचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी सांगितलं आहे. सत्य लवकरच सर्वांसमोर येईल, असंही ते पुढे म्हणाले.
 
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनूसार, संपूर्ण चौकशीनंतर कंगणा विरोधात एफआयआर दाखल केला जाणार आहे. निर्माते केतन मेहता यांनी एफआयआर दाखल करण्याची मागणी करत लेखी तक्रार दाखल केली आहे. यानुसार कंगणाची चौकशी केली जाते आहे. कंगणाला तिची बाजू मांडण्यासाठी बोलावलं जाणार आहे.