Join us

राम कदम यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 6:17 AM

राष्ट्रवादी महिला काँग्रेसची राज्याच्या महिला आयोगाकडे मागणी

मुंबई : दहीहंडी उत्सवादरम्यान मुलींना उचलण्याची भाषा करणारे भाजपा आमदार राम कदम यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने मंगळवारी राज्याच्या महिला आयोगाकडे केली.राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी वांद्रे येथील महिला आयोगाच्या कार्यालयात आयोगाच्या सदस्य सचिव मंजुषा मोळवणे यांची भेट घेतली. आमदार रताम कदम यांनी गोविंदांसमोरील जाहीर भाषणात मुलींना पळवून आणण्याबाबतचे विधान केले आहे. त्यांच्या विधानावर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात महिला आयोगाने पाठविलेल्या नोटिसीला उत्तर देताना, राम कदम यांनी बिनशर्त माफी मागितल्याचे वृत्त प्रसार माध्यमात आले आहे. मात्र, माफी मागितल्याने कदम यांच्या विधानाचे गांभीर्य कमी होत नाही. राज्यात महिलांविरोधात अत्याचार वाढत असताना, कदम यांच्यासारख्या प्रवृत्तींविरोधात कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी राष्ट्रवादीने केली.त्यांच्याविरोधात भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३६३, ११६ अन्वये अपहरणाचा फौजदारी गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :राम कदमदही हंडीभाजपा