नानावटी रुग्णालयाच्या विश्वस्तांवर गुन्हे दाखल करा - धर्मादाय आयुक्तांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 02:05 AM2017-09-27T02:05:41+5:302017-09-27T02:08:41+5:30
निर्धन रुग्णांना मोफत तर दुर्बल घटकातील रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार करणे बंधनकारक आहे. नानावटी रुग्णालयात मात्र या नियमाचे पालन होत नाही.
- गौरीशंकर घाळे
मुंबई : गरीब रुग्णांवरील उपचार टाळाटाळ करणे, निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांच्या उपचारांसाठी राखीव खाटा अन्य रुग्णांना देणे, दुर्बल घटकातील रुग्णांसाठी असणा-या योजनांची माहिती रुग्णालयातील दर्शनी भागात न लावणे आदी कारणांवरून डॉ. बालाभाई नानावटी रुग्णालयाच्या विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिले आहेत. गरीब रुग्णांचा आवाज आणि त्यांच्या वेदना या विश्वस्तांपर्यंत पोहोचत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी नानावटीला फटकारले आहे.
निर्धन रुग्णांना मोफत तर दुर्बल घटकातील रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार करणे बंधनकारक आहे. नानावटी रुग्णालयात मात्र या नियमाचे पालन होत नाही. राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी स्वत: १२ सप्टेंबर रोजी रुग्णालयाची अचानक पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला होता. आयुक्तांनी स्वत:ची ओळख लपवून गरिबांसाठीच्या योजना जाणून घेण्याच्या प्रयत्न केला असता नानावटी रूग्णालयात ‘चॅरिटी’ नसल्याचे उत्तर रिसेप्शनीस्टकडून देण्यात आले होते.
रिसेप्शनीस्ट आणि रुग्णालयातील समाजसेवक, आरोग्यसेवकांनीही अशा प्रकारच्या योजनेची माहिती नव्हती. शिवाय, रुग्णालयात दर्शनी भागावर योजनांसंबंधीचे फलक लावण्यात आले नव्हते. यानंतर धर्मादाय आयुक्तांनी नानावटी रुग्णालयाला रीतसर नोटीस पाठवून खुलासा मागविला होता. या नोटीसीनंतर झाल्या प्रकाराबाबत रुग्णालयाने धर्मादाय आयुक्तांची बिनशर्त माफी मागितली होती.
तसेच आतापर्यंत गरिबांसाठीच्या योजनेअंतर्गत अनेक रुग्णांवर उपचार केल्याचा दावा केला होता. गेल्या पाच वर्षांपासून गरिबांवर उपचार करत असल्याचा रुग्णालयाचा दावा केवळ रेकॉर्डसाठी आहे, असे आयुक्तांनी नमूद केले आहे़
६६ पैकी अवघ्या १२ खाटांवर गरीब रुग्ण
नानावटी रुग्णालयात गरिबांसाठी ६६ खाटा आहेत. त्यापैकी फक्त १२ खाटांवर गरजूंवर उपचार होत असल्याचे धर्मादाय आयुक्तांच्या १२ सप्टेंबरच्या पाहणीत आढळून आले होते. त्यापूर्वी मे, २०१७मध्ये धर्मादाय कार्यालयाने पाहणी केली असता ६६पैकी केवळ सात खाटांवरच गरिबांचे उपचार सुरू होते. इतर ठिकाणी पैसे देऊन उपचार घेणारे रुग्ण होते.
तुम्हाला गरीब मिळत
कसे नाहीत?
एकीकडे सरकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गरिबांना उपचारासाठी गर्दी करावी लागते. तर, दुसरीकडे तुमच्याकडे गरीब रुग्ण येत नाहीत, ही बाब मनाला पटणारी नसल्याचे धर्मादाय आयुक्तांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात नानावटी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र पाटणकर यांच्याशी संपर्क साधला असता, अशा प्रकारच्या कारवाईची अधिकृत माहिती अथवा सूचना आम्हाला मिळाली नाही. त्यामुळे यावर काही भाष्य करता येणार नसल्याचे पाटणकर यांनी सांगितले.