ऊर्जामंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, राजू शेट्टींचा तीव्र संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 03:32 PM2021-03-22T15:32:41+5:302021-03-22T15:34:02+5:30
बाबासाहेब यांच्या पत्नी कोथींबीर विकण्यासाठी गावात गेल्या असता, घरातून विषारी द्रव्य घेऊन ते द्राक्षबागेत गेले, व तेथेच त्यांनी औषध घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला
मुंबई - नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याने स्वत:च्याच द्राक्षबागेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घडना उघडकीस आली आहे. वीजबिलाची थकबाकी भरण्याची त्यांची परिस्थिती नव्हती. मात्र, वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या शेतीतील वीज तोडली. त्यामुळे, गेल्या 4 दिवसांपासून बंद असलेला डीपी पाहून ते चिंतेत होते. त्यातच, शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने ते आणखीच चिंताग्रस्त झाले. शिवाय, लॉकडाऊनच्या बातम्यामुळे द्राक्षांचा भावही बाजारात घटला होता. त्यामुळे, बाबासाहेब ठुबे या शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. या घटनेनंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.
बाबासाहेब यांच्या पत्नी कोथींबीर विकण्यासाठी गावात गेल्या असता, घरातून विषारी द्रव्य घेऊन ते द्राक्षबागेत गेले, व तेथेच त्यांनी औषध घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच त्यांच्या पत्नी त्यांना शोधत द्राक्षबागेत आल्यानंतर समोरील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यावेळी, स्थानिकांच्या मदतीने बाबासाहेब यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या शेतातील वीज तोडल्यामुळे ते त्रस्त होते, शेतीची कामं आणि बागेची काढणी यंत्रांशिवाय कशी करायचा हीही प्रश्न त्यांना भेडसावत होता. त्यातून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचचलं. या घटनेनंतर शेतकरी नेते राजू शेट्टी यानी तीव्र संताप व्यक्त केलाय.
राज्यकर्त्यांनो कोरोनाच्या नावाखाली हजारो कोटीचा घोटाळा केलात.मंत्र्यांच्या दालनावरती कोट्यावधी रूपयाचा चुराडा केलात. संगनमताने जनतेच्या खिशातून १०० कोटी लुटीसाठी सर्वजण सैराठ झालात.
— Raju Shetti (@rajushetti) March 22, 2021
खेडगांव ता. दिंडोरी येथील बाळासाहेब बाबुराव ठुबे या माझ्या बळीराजाने मात्र द्राक्ष पिक
राज्यकर्त्यांनो कोरोनाच्या नावाखाली हजारो कोटीचा घोटाळा केलात.मंत्र्यांच्या दालनावरती कोट्यावधी रूपयाचा चुराडा केलात. संगनमताने जनतेच्या खिशातून १०० कोटी लुटीसाठी सर्वजण सैराट झालात. खेडगांव ता. दिंडोरी येथील बाळासाहेब बाबुराव ठुबे या माझ्या बळीराजाने मात्र द्राक्ष पीक डोळ्यांसमोर करपू लागल म्हणून हजार रूपयाच्या थकबाकीसाठी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. त्यामुळे उर्जामंत्री व संबंधित महावितरणचे अधिकारी यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, असे ट्विट राजू शेट्टींनी केले आहे.