Join us

पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:06 AM

काेराेनाने घेतला जीव; राजेश सावंत यांची कांदिवली पोलिसांत लेखी तक्रारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना अहवाल वेळेत न ...

काेराेनाने घेतला जीव; राजेश सावंत यांची कांदिवली पोलिसांत लेखी तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना अहवाल वेळेत न मिळाल्याने रेमडेसिविर इंजेक्शन अभावी राजेश्वरी सावंत (४१) यांचा मृत्यू झाल्याचा आराेप करत याप्रकरणी त्यांचे पती राजेश यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी त्यांची मागणी आहे.

श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने राजेश्वरी यांचे पती राजेश यांनी १० एप्रिल, २०२१ पासून त्यांच्या उपचारासाठी बरीच वणवण केली. अखेर १४ एप्रिल, २०२१ रोजी कोरोनाने त्यांच्या पत्नीचा जीव घेतला. राजेश्वरी यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल त्यांना वेळेत न मिळाल्याने हा प्रकार घडला. मुख्य म्हणजे जो अहवाल राजेश यांना देण्यात आला तोही संशयास्पद आहे, असा त्यांचा आराेप आहे.

महापालिका आर/ साऊथ वॉर रुममधील अधिकारी, आर/ साऊथचे आरोग्य अधिकारी, लॅब कर्मचारी आणि बीकेसी कोविड केंद्रातील प्रशासन व डॉक्टरांचा हलगर्जीपणा पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरला, असा आराेप करत संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे. यासाठी त्यांनी कांदिवली पोलीस ठाण्यापासून स्थानिक आमदार, खासदार ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सर्वांकडे दाद मागितली आहे. लवकरात लवकर न्याय मिळून दोषींवर कारवाई होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

.........................