१८७ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची फाईल अडली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 05:34 AM2021-09-06T05:34:29+5:302021-09-06T05:35:00+5:30
विभागाची सुस्ताई : एसीपीच्या प्रमोशनपूर्वी अनेक निवृत्त
जमीर काझी
मुंबई : जवळपास तीन दशकांच्या सेवेनंतर निवृत्तीपूर्वी उपविभागीय अधिकारी, साहाय्यक आयुक्तपदाचा मान मिळावा, यासाठी प्रतीक्षेत असलेल्या राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे. त्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव कासवगतीने पुढे सरकत आहे. १८७ अधिकाऱ्यांची फाईल पंधरवड्यापासून सामान्य प्रशासन विभागाकडे (जेडीए) मान्यतेसाठी प्रलंबित आहे. प्रशासनाच्या या सुस्ताईमुळे बढतीसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांना किमान आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनेकजण प्रमोशनशिवाय निवृत्त झाले आहेत.
गृह विभागाकडून गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये १२५ निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली होती. १९८९ उपनिरीक्षक म्हणून भरती झालेल्या अधिकाऱ्यांना बढती मिळाली. त्याला वर्ष उलटले असले तरी अद्याप नवीन यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्त पदांचे प्रमाण २४० पर्यंत वाढत गेले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांकडून तीव्र नाराजी उमटू लागल्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयातून गेल्या महिन्यात सेवाज्येष्ठतेनुसार बढतीसाठी पात्र अधिकाऱ्यांची नावे पाठविण्यात आली. गृह विभागाने त्याची छाननी करून प्रस्ताव मान्यतेसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला आहे. त्याला पंधरवडा उलटूनही मान्यता मिळालेली नाही. त्यांच्यानंतर ती वित्त विभागात पाठविली जाईल, त्यांच्या मान्यतेनंतर पुन्हा डीजी ऑफिसकडे संबंधितांचा संवर्ग निश्चितीसाठी पाठविला जाईल. त्यानंतर गृहविभागाकडून त्याबाबत आदेश जारी केले जातील, त्याबाबत गतिशीलता न दाखविल्यास महिनाभराचा अवधी लागेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
बहुतांश पदोन्नतीबाबत आरक्षण घटकातील
मागासवर्गीय घटकांतील अधिकाऱ्यांच्या आरक्षणातून पदोन्नतीतून देण्याबाबतची याचिका अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अडीच वर्षांपासून या प्रवर्गातील जागा रिक्त ठेवल्या होत्या. आता २००५पूर्वी प्रमोशन घेतलेल्यांना प्रमोशन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे या वेळच्या बढतीमध्ये या घटकांतील बहुतांश अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
प्रभारी पद मिळत नसल्याने अधिकाऱ्यांत नाराजी
मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ निरीक्षक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्याची बढती न झाल्याने त्यानंतर दुय्यम पदावर असलेल्यांना प्रभारी पद मिळेना झाले आहे; त्यामुळे त्यांच्यातही नाराजीचे वातावरण आहे.