मुंबई : मजूर असल्याचे दाखवून मुंबई बँकेच्या संचालकपदी निवडणूक लढवून २० वर्षे फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरेकरांच्या प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेविरोधात गुन्हा नोंदवला आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षाने त्यांच्या अटकेची मागणी केली आहे, तर दरेकरांवर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
आम आदमी पार्टीचे नेते धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गेली २० वर्षे मजूर असल्याचे खोटे भासवून प्रवीण दरेकर हे मुंबई बँकेवर संचालक, अध्यक्ष म्हणून निवडून येत आहेत. यादरम्यान मुंबई बँकेत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले असून, त्याबाबत सहकार विभागाने वेळोवेळी सहकार कायदा चौकशी करून अहवाल दिले आहेत. २०१५ पासून नाबार्डच्या प्रत्येक अहवालात अनियमितता व घोटाळ्यांवर ठपका ठेवलेला आहे, असे तक्रारीत नमूद आहे.
चुकीचा ‘एफआयआर’ केला - प्रवीण दरेकर
मजूर संस्थेचा सभासद म्हणून आधीच राजीनामा दिल्याने तो विषय संपलेला आहे. तरीही विविध मार्गाने गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. माझ्याविरोधात चुकीचा ‘एफआयआर’ दाखल झाला आहे. याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे; परंतु ही सर्व कारवाई महाविकास आघाडीचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
दरेकर आडनाव बदलून ‘दरोडेखोर’ करा - पटोले
बँकेतील घोटाळ्याप्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्यावर दाखल केलेला गुन्हा कायदेशीरच आहे. बँकेवर दरोडा टाकणाऱ्या दरेकर यांनी आता आडनाव बदलून दरोडेखोर असे करावे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी लगावला. पटोले म्हणाले की, मुंबई सहकारी बँकेची लूट करण्यात आली. लेखापरीक्षण अहवालात तसे स्पष्ट झाले आहे. सहकार विभागाला कारवाई करण्याचा अधिकार आहे, त्यानुसार सहकार विभागाने ही कारवाई केलेली आहे. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केलेली नाही.