मुंबई : अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली असून याचाच एक भाग म्हणून गर्दीची ठिकाणे, मॉल येथील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. शहरातील मॉलची सुरक्षा तपासताना कुर्ला येथील फिनिक्स मॉलची सुरक्षा बेभरवशाची असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याची दखल घेत पोलिसांनी या मॉलविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीअंतर्गत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्याबाबत सांगण्यात आले. त्यामध्ये मॉल सुरक्षाही तितकीच महत्त्वाची असल्याने त्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकटेश पाटील यांनी फिनिक्स मॉलच्या सुरक्षेचा आढावा घेतला. या वेळी तपास पथकाला सुरक्षेत हलगर्जीपणा दिसून आला. शुक्रवारी साध्या वेशात पोलिसांनी हत्यार सोबत घेऊन मॉलमध्ये सहज प्रवेश केला. तेव्हा त्यांना कुणीही हटकले नसल्याची माहिती पाटील यांनी दिली. सुरक्षेतील हलगर्जीपणामुळे फिनिक्स मॉल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
‘फिनिक्स’विरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: July 26, 2015 3:43 AM