Join us

घुसखोर बांग्लादेशी महिलेवर कारवाई न केल्याबद्दल देवेन भारतींविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 7:05 AM

याप्रकरणी गुन्हे गुप्तवार्ता पथकाचे पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

मुंबई : घुसखोर बांग्लादेशी महिलेला अनधिकृतपणे भारतात प्रवेश करण्यासाठी पासपोर्ट बनवून देण्यात आल्याप्रकरणी निवृत्त पोलीस निरीक्षक दीपक कुरुलकर यांची तक्रार दाखल करून न घेतल्याच्या आरोपावरून तत्कालीन सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) देवेन भारती आणि सहायक पोलीस आयुक्त दीपक फटांगरे गुन्हे गुप्तवार्ता पथकाने मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

देवेन भारती सध्या सुरक्षा महामंडळात अप्पर पोलीस महासंचालक या पदावर नियुक्त आहेत. दीपक कुरुलकर यांच्या आरोपानुसार, घुसखोर बांग्लादेशी  आरोपी रेश्मा खानने अनधिकृतरीत्या भारतात प्रवेश करत अन्य साथीदारांच्या मदतीने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट बनवला होता. त्याप्रकरणी कुरुलकर यांनी तक्रार करूनही फटांगरे आणि भारती यांनी गुन्हा दाखल केला नाही. उलट तक्रार दाखल न करण्यासाठी कुरुलकर यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप आहे. 

याप्रकरणी गुन्हे गुप्तवार्ता पथकाचे पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर भालेराव यांना विचारणा केली असता त्यांनी अधिक माहिती देण्याचे टाळले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मालवणी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम ४६५, ४६७, ४६८, ४७१,४२० आणि ३४ तसेच कलम १२ (१-अ) (अ) आणि (ब) भारतीय पारपत्र अधिनियम १९६७ सह नियम क्रमांक  ३, ६ पारपत्र (भारतामध्ये प्रवेश करण्याबाबत नियम) १९५०, सह कलम ३ पारपत्रान्वये भारतामध्ये प्रवेश करण्याबाबत अधिनियम १९२० सह कलम ३ (१) विदेशी नागरिकाबाबतचा अध्यादेश १९४८ सह कलम १३,१४ (अ)(ब) विदेशी नागरिक अधिनियम १९४६ अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. गैरकायदेशीर कृत्य करत भारताची सुरक्षा धोक्यात आणल्याचा  त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याबाबत देवेन भारती यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.