वरळी कार्यालयाबाहेर गर्दी : आयोजकांसह ४३ राजकीय मंडळी आणि १२० समर्थकांविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांची वर्णी न लागल्यामुळे नाराज झालेले मुंडे समर्थक मंगळवारी मुंबईत धडकले. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वरळीतील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत येथे बैठक आयोजित करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांसह येथे जमलेल्या ४३ राजकीय नेतेमंडळीसह १०० ते १२० कार्यकर्त्यांविरुद्ध वरळी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पंकजा मुंडे यांच्या वरळी येथील निवासस्थान असलेल्या सुखदा इमारतीतील गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान संपर्क कार्यालयाबाहेर बीड, बुलडाणा, जळगाव, शिरुर, अहमदनगर अशा विविध भागांतून अनेक कार्यकर्ते, राजकीय नेते दाखल झाले होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी भाषण करत आपली भूमिका मांडली.
यावेळी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता विनामास्क सभा आयोजित केली. तसेच त्या ठिकाणी उपस्थित राहिले म्हणून वरळी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सोनावणे यांच्या फिर्यादीवरून वरळी पोलिसांनी कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यात ४३ राजकीय नेतेमंडळीसह १०० ते १२० कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यापैकी १७ जणांना ताब्यात घेत नोटीस देत सोडून देण्यात आले आहे.
आयोजक तसेच सभेत उपस्थित असलेल्या सर्वांविरोधात हा गुन्हा दाखल असल्याचे वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कोळी यांनी सांगितले. त्यानुसार तपास सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.