सायबर पोलिसांकडून तपास सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘फोन टॅपिंग’ प्रकरणात राज्य गुप्तवार्ता विभागाचा (एसआयडी) अहवाल लीक झाल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी शुक्रवारी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, सायबर विभागाचे सहायक आयुक्त तपास करीत आहेत.
मुंबई पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य गुप्तवार्ता विभागाने दिलेल्या तक्रारीवरून शासकीय गुपिते अधिनियम (ऑफिशियल सीक्रेट अॅक्ट), माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दूरसंचार अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यात अनोळखी व्यक्तीने राज्य गुप्तवार्ता विभागातील गोपनीय कागदपत्रे व अन्य तांत्रिक माहिती बेकायदेशीररीत्या प्राप्त केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानुसार सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत. गुरुवारी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला सादर केलेल्या अहवालात राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनीच तो अहवाल लीक केल्याचा संशय वर्तविला होता.