दीपक निकाळजेवर बलात्काराचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:16 AM2018-03-20T00:16:51+5:302018-03-20T00:16:51+5:30
आर्थिक मदत करण्याच्या बहाण्याने २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी कुख्यात गँगस्टर छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेविरुद्ध टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेली चार वर्षे तो तरुणीवर अत्याचार करत होता.
मुंबई : आर्थिक मदत करण्याच्या बहाण्याने २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी कुख्यात गँगस्टर छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेविरुद्ध टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेली चार वर्षे तो तरुणीवर अत्याचार करत होता. यादरम्यान तिचा गर्भपातही करण्यात आला. हा गुन्हा पुढील तपासासाठी रविवारी रात्री उशिराने पनवेल तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
तरुणी टिळकनगर परिसरात आई-वडिलांसोबत राहते. निकाळजे रिपाइंचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहे. समाजसेवा म्हणून ते आर्थिक मदत करतात ही माहिती तक्रारदार तरुणीच्या कुटुंबाला मिळाली होती. त्यानुसार तिची आई आपल्या मुलीला घेऊन त्याच्याकडे आर्थिक मदतीसाठी गेली होती. त्याने २०१४ मध्ये तिच्या आईला आर्थिक मदत केली होती. मात्र, त्यानंतर आर्थिक मदतीच्या नावाखाली त्याने मुलीला फार्महाउसवर बोलावून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वेळोवेळी त्याने अत्याचार केल्याचे तिचे म्हणणे आहे. निकाळजेचे अत्याचार वाढू लागल्याने रविवारी घडलेला प्रकार तिने कुटुंबाला सांगितला. कुटुंबीयांनी टिळकनगर पोलिसात तक्रार दिली. पण निकाळजेने पनवेलमधील वावंजे (महाळुंगी) येथील फार्महाउसवर बलात्कार केल्याने हा गुन्हा पनवेल तालुका पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.