‘वांद्रे’ फाईलींचे धागेदोरे नाशिकपर्यंत
By Admin | Published: February 20, 2015 01:09 AM2015-02-20T01:09:05+5:302015-02-20T01:09:05+5:30
वांद्रे’ शासकीय विश्रामगृहावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) हाती लागलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या काही फाईलींचा संबंध नाशिक येथील काही अधिकाऱ्यांशी जोडला जात
नाशिक : ‘वांद्रे’ शासकीय विश्रामगृहावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) हाती लागलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या काही फाईलींचा संबंध नाशिक येथील काही अधिकाऱ्यांशी जोडला जात असून, त्यातही माजी सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) राहिलेल्या व सध्या खात्यातून बाहेर पडलेल्या एका अभियंत्याच्या बंधूशी संबंधित फाईली असल्याची चर्चा होत आहे.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन व मुंबईत मंत्र्यांच्या बंगल्यांची देखभाल दुरुस्ती संदर्भात कामे केल्याच्या काही फाईली अलीकडेच एसीबीने वांद्रे येथील विश्रामगृहाच्या खोलीतून ताब्यात घेतल्या आहेत. त्यात नाशिक व ठाणे येथे झालेल्या काही कामांच्याही फाईली सापडल्याने एसीबीने चौकशीला सुरुवात केली असून, भुजबळ यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी राहिलेल्या माजी अभियंत्याच्या नातेवाईकांच्या नाशिकमध्ये झालेल्या कामांच्या फाईलींचा समावेश आहे.
संबंधित माजी अभियंत्याच्या मर्जीनेच नाशिकमध्ये त्याच्या नातेवाइकाला कामाचे ठेके मिळाले होते व त्याच्या दबावातूनच काही अधिकारी या ठेकेदाराला मदत करून त्याच्या फाईली ‘क्लिअर’ करीत होते, असे समजते. संबंधित माजी अभियंत्याच्या ठेकेदार नातेवाईकाने नाशिक व धुळे येथील शासकीय विश्रामगृहाच्या देखभाल, दुरुस्तीचे कंत्राट घेतले होते व त्याच कामाच्या या फाईली असल्याचे एसीबीच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. माजी बांधकाममंत्र्यांचा विशेष कार्य अधिकारी राहिलेल्या या माजी अभियंत्याने नोकरीचा राजीनामा देऊन नुकतीच विधानसभा निवडणूक लढविली, परंतु त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. (प्रतिनिधी)
ओझर विमानतळावरील मद्यपार्टीप्रकरणी नाशिकच्या चार अभियंत्यांना मुख्यमंत्र्यांनी निलंबित केले मात्र इतरांवर त्यांनी काहींवर मेहेरनजर दाखविल्याचे बोलले जात आहे. अधीक्षक अभियंता पी. व्ही. देशमुख यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त होणाऱ्या पार्टीसाठी विमानतळाचे आवार उपलब्ध करून देणारे कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील, उपअभियंता सोनवणे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी मेहेरनजर दाखविल्याचा आरोप होत आहे.