- यदु जोशी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्रिमंडळात आल्याने अस्वस्थ होण्याचे कारण नाही. तुमची कोणतीही कामे अडणार नाहीत. मी मुख्यमंत्री आहे. शेवटी सगळ्या फायली माझ्याकडेच येणार ना? तुमच्या मतदारसंघांनाही कोणताच धोका मी पोहोचू देणार नाही, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदार, खासदारांना बुधवारी रात्री एका बैठकीत आश्वस्त केले.
राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळातील सहभागामुळे शिवसेनेचे आमदार कमालीचे अस्वस्थ असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी रात्री वर्षा बंगल्यावर आमदार, खासदारांची बैठक घेतली. आपणच मुख्यमंत्री पदावर कायम राहणार असून, अजिबात नाराज नाही. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे ते म्हणाले. शिंदे हे मंगळवारी रात्री नागपुरात राष्ट्रपतींचे स्वागत करण्यासाठी गेले आणि अचानक मुंबईला परतले. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. आमच्या मतदारसंघातील कामे त्यांनी अडवली तर आम्ही प्रत्येक वेळी तुमच्याकडे तक्रार करू. तुम्ही आम्हाला न्याय द्याल असा मला विश्वास आहे, अशी भावना पाच-सहा आमदारांनी बैठकीत व्यक्त केली. त्यावर तुम्ही अजिबात काळजी करू नका, शेवटी मी मुख्यमंत्री आहे असे शिंदे म्हणाले.