पॉवर्स अँड इंडस्ट्रियल कंपनीच्या संचालकांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:06 AM2021-06-25T04:06:12+5:302021-06-25T04:06:12+5:30
अडीच हजार कोटींची फसवणूक; मुंबईसह तीन ठिकाणी शोधमोहीम लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बनावट दस्तावेज आणि विविध कंपन्या स्थापन ...
अडीच हजार कोटींची फसवणूक; मुंबईसह तीन ठिकाणी शोधमोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बनावट दस्तावेज आणि विविध कंपन्या स्थापन करून एसबीआयसह विविध बँकांतून कर्ज घेऊन तब्बल २४३५ कोटींचा गंडा घालणाऱ्या मुंबईतील पॉवर्स अँड इंडस्ट्रियल कंपनीच्या माजी मुख्य कार्यकारी संचालकांवर केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी गुन्हे दाखल केले. मुंबईसह दिल्ली व गुडगाव येथील कार्यालयाच्या परिसरात ही शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती.
याबाबत कंपनीचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम थापर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक के. एन. नीलकांत, माधव आचार्य, बी. हारिहरण, ओंकार गोस्वामी, व्यंकटेश राममूर्ती व अन्य अनोळखी सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संचालक मंडळाने बँकेतील अधिकाऱ्याशी संगनमत करून एसबीआयसह अन्य विविध बँकांची फसवणूक केली आहे.
पॉवर्स अँड इंडस्ट्रियल कंपनीने वार्षिक गुंतवणूक व उलाढाल शेकडो कोटींची असल्याचे कागदोपत्री भासविले, बनावट दस्तावेज, कंपन्या असल्याचे भासवून एसबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस, येस, कार्पोरेशन, बार्कलेज बँक, इंडसइंड या बँकांतून कोट्यवधींची कर्जे घेतली होती. त्याची परतफेड न करता ती बुडवली.
* लेखापरीक्षणात गैरव्यवहार उघडकीस
बँकेच्या वार्षिक लेखापरीक्षणात गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर एसबीआय बँकेने सीबीआयकडे तक्रार केली. त्यानुसार गुरुवारी पॉवर्स अँड इंडस्ट्रियल कंपनी आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, तत्कालीन सीएफओ, तत्कालीन संचालक आणि अज्ञात व्यक्ती, बँक अधिकाऱ्यावर २४३५ कोटींची फसवणूक आणि कर्जबुडवेगिरी केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. दक्षिण मुंबईतील मुख्य कार्यालयासह दिल्ली व गुडगाव येथील कार्यालयावर स्वतंत्र पथकाद्वारे शोधमोहीम राबवून झडती घेण्यात आली.
-----------------------------