मुंबईः रत्नागिरीतल्या चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानं चहूबाजूंनी फडणवीस सरकारवर टीका होतेय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी या प्रकरणावरून आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधला आहे. तिवरे धरण फुटल्यामुळे झालेले मृत्यू सरकारच्या अनास्थेचे बळी आहेत. फडणवीस सरकारवर ३०२अंतर्गत गुन्हा दाखल करावा, तसेच सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने धरणाचे बांधकाम केले होते. आमदार आणि कंपनीवर लागलीच गुन्हा दाखल करावा. या घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तत्पूर्वी सरकारच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे जीव जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला होता. चिपळूणच्या घटनेत सरकारने तातडीने मदत करावी. सरकारच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे जीव जात असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला. तर आता पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिटचा प्रश्न उपस्थित होत असल्याचे ही मुंडे म्हणाले होते.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकणातही वरुणराजा तुफान बरसत आहे. पावसाचा जोर कायम असल्यानं चिपळूणमधील तिवरे धरण काल रात्री साडेआठच्या सुमारास भरलं. त्यानंतर ते ओव्हरफ्लो झालं. थोड्याच वेळात धरणाला भगदाड पडलं आणि परिसरात खळबळ माजली. यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती प्रशासनाला दिली. जोरदार पाऊस झाल्यास धरण फुटू शकतं, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली होती. त्यांनी याबद्दलची तक्रार पाटबंधारे विभागाकडेदेखील केली होती. यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी केली. धरणाचं ओव्हरफ्लो होणारं पाणी वशिष्ठीच्या खाडीला आणि शास्त्री नदीला जाऊन मिळत असल्यानं धरणाला धोका नसल्याचं अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. स्थानिकांनी व्यक्त केलेली भीती काल रात्री खरी ठरली. धरण फुटल्यानं ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांमध्ये पाणी शिरलं. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यानं 24 जण वाहून गेले. धरण परिसरातील 13 घरंदेखील प्रवाहात वाहून गेली. यामुळे मोठी वित्तहानी झाली. सध्या एनडीआरएफच्या जवानांकडून बचावकार्य सुरू असून आतापर्यंत 9 जणांचे मृतदेह शोधण्यात यश आलं आहे.