Join us

मोर्चेकऱ्यांवर गुन्हा दाखल

By admin | Published: October 29, 2015 12:23 AM

पोलीस मारहाणीत पुरुषोत्तम नाडर (३१) या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मंगळवारी धारावीतील शेकडो रहिवाशांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता

मुंबई : पोलीस मारहाणीत पुरुषोत्तम नाडर (३१) या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मंगळवारी धारावीतील शेकडो रहिवाशांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. त्यामुळे दोन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. याबाबत धारावी पोलिसांनी ३५० रहिवाशांवर गुन्हा दाखल केला आहे. धारावीमध्ये कुटुंबीयांसह राहत असलेला नाडर १८ आॅक्टोबरला येथील ९० फूट रोडवरील धारावी रेस्टॉरंट परिसरात उभा होता. मोहरमनिमित्त मुस्लीम बांधवांकडून उभारलेल्या पाणीपोईकडे तो पाणी पिण्यासाठी गेला होता. मात्र याच वेळी त्याच्याकडून पाण्याचे मटके खाली पडले. ही बाब याच ठिकाणी असलेल्या काही तरुणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला बेदम चोप देत धारावी पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्याची चौकशी केली. मात्र तो दारूच्या नशेत असल्याने काहीही बोलू शकला नाही. काही वेळानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने पोलिसांनी त्याला सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. मात्र नाडरला रहिवाशांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तसेच प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांनी तीन दिवस याची माहिती कोणालाही दिली नसल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला. त्यानुसार मंगळवारी सुमारे ३०० ते ४०० रहिवाशांनी धारावी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत दोषी पोलिसांवर तत्काळ हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. सुमारे दोन तास धारावी पोलीस ठाण्याबाहेर रहिवाशांचा गोंधळ सुरू होता. त्यामुळे या परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. याबाबत धारावी पोलिसांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा या रहिवाशांवर दाखल केला आहे. (प्रतिनिधी)