Join us

मुंबईत रंगणार फिल्मिंगो आंतरराष्ट्रीय लघुपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2016 4:23 PM

मुंबईतील प्रायोगिक नाट्य चळवळीमध्ये आपला स्वतंत्र व वैशिष्ठ्यपूर्ण ठसा उमटविलेल्या प्रयोग मालाड या संस्थेने “फिल्मिंगो आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव ” आयोजित केला आहे.

मनोहर कुंभेजकर, ऑनलाइन लोकमत
मुंबई , दि. २ -  मुंबई उपनगरात गेली ४० वर्षे सातत्याने विविध समाजसेवी उपक्रम राबणारी प्रयोग मालाड ही एक मान्यवर संस्था आहे. मुंबईतील प्रायोगिक नाट्य चळवळीमध्ये आपला स्वतंत्र व वैशिष्ठ्यपूर्ण ठसा उमटविलेल्या प्रयोग मालाड या संस्थेने  “फिल्मिंगो आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव ”  आयोजित करण्याचे ठरविले आहे. मान्यवर जेष्ठ चित्रपट अभ्यासक व समीक्षक अशोक राणे यांचे मार्गदर्शन या महोत्सवासाठी लाभलेले आहे. ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान  रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे संपन्न होणाऱ्या महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यास सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी आणि पारितोषिक वितरण सोहळ्यास एशियन फिल्म फेस्टिवलचे अध्यक्ष किरण शांताराम  व  राज्याचे उद्योगमंत्री  सुभाष देसाई  उपस्थित राहणार आहेत. प्रयोग मालाडचे अध्यक्ष दिलीप म्हात्रे आणि या फिल्म फेस्टिवलचे संचालक सुदेश म्हात्रे यांनी ही माहिती दिली.
 
चित्रपटक्षेत्रात प्रवेश करू पाहणाऱ्या तरुणाईला योग्य मार्गदर्शन उपलब्ध करण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांची जागतिक पातळीवर दखल घेतली जावी, त्यांच्या कलेसाठी व्यासपीठ निर्माण करावे हे ध्येय समोर ठेवूनच फिल्मिंगो आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव  २०१६ चे संपूर्ण आयोजन  करण्यात आले आहे. लघुपट या माध्यमाचे स्वतंत्र अस्तित्व व ते सादर करण्याची समज नवोदित कलाकारांना यावी यासाठी फिल्म फेस्टिवलच्या आधी कार्यशाळा आयोजित करणारा, फिल्मिंगो हा भारतातलाच नव्हे तर संपूर्ण जगातील एकमेव व  अभिनव लघुपट महोत्सव आहे.
या महोत्सवाआधी संस्थेतर्फे मुंबई, विरार, ठाणे  आणि पुणे येथे लघुपट निर्मितीच्या विविध अंगांचे प्रशिक्षण देणाऱ्या कार्यशाळांचे जुलै व ऑगस्ट महिन्यात आयोजन करण्यात आले होते. ४०० पेक्षा अधिक युवकांनी याचा लाभ घेतला आहे.
 
स्पर्धा व प्रदर्शन अशा दोन विभागांमध्ये होणाऱ्या या महोत्सवात देश-विदेशातून एकूण १७० लघुचित्रपट दाखल झाले असून त्यामध्ये भारतासमवेत इंग्लंड, अमेरिका, अफगाणीस्तान, इराण आणि इस्रायल येथील स्पर्धकांचा समावेश आहे. महोत्सवातील सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या पहिल्या ५ लघुचित्रपटाना रु.३ लाखा पर्यंतची रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह, त्याच बरोबर त्यांचे लघुपट प्रतिष्ठित कान्स फेस्टिवल – २०१७, फ्रान्स येथे पाठविण्याची जबाबदारी संस्था स्वीकारणार आहे.भारतातून याआधी Cannes Short Film Corner ला निवड झालेले लघुपट व त्याचप्रमाणे FTII मधील पारितोषिक प्राप्त लघुपट फिल्मिंगो महोत्सवामध्ये सादर  करण्यात येणार आहेत.
सहभागी झालेल्या सर्वात प्रतिभाशाली व सर्जनशील स्पर्धकांना बर्लिन आंतरराट्रीय चित्रपट महोत्सवातील Berlin Talent Campus येथे सहभागी होण्यासाठी योग्य ते मार्गदर्शनही देण्याचा फिल्मिंगोचा हेतू आहे.  फिल्मिंगो लघुपट महोत्सवातील पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट लघुचित्रपट - प्रथम व द्वितीय  तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, पटकथा लेखक, संपादक, अभिनेता आणि अभिनेत्री असे सहा वैयक्तिक पुरस्कार यांचा समावेश आहे. विनोद गणात्रा,शफाअत खान,रघुवीर कुल,गणेश मतकरी आणि  मीना कर्णिक ही मान्यवर मंडळी अतिम फेरीचे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. 
 
महोत्सवाचे अजून एक विशेष आकर्षण म्हणजे दिनांक ५ नोव्हेंबर रोजी होणारा सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अनुभवी मागर्दर्शक  विकास देसाई यांचा मास्तर क्लास.
अधिक माहितीसाठी www.filmingo.in येथे संपर्क साधता येईल.