श्रीकांत जाधवलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापूर, भूकंप, समुद्री पर्यावरणाचा ऱ्हास अशी अनेक संकटांची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली असताना किनारी रस्ता प्रकल्पासाठी (कोस्टल रोड) समुद्रात भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे समुद्रातील जवळपास १११ हेक्टर जमीन मुंबई महापालिकेच्या अखत्यारित आली आहे. या भरावावर ५ किलोमीटरचा नवीन रस्ता, ४ भूमिगत वाहन तळ, ८ किलोमीटरचा नवीन पदपथ पालिकेने प्रस्तावित केला आहे.
मुंबई महापालिकेचा किनारी रस्ता प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी असा आहे. त्यासाठी महापालिकेने ३ हजार ५४५ कोटी रुपये इतकी आर्थिक तरतूद केली आहे, तर या प्रकल्पाचा एकूण खर्च १२ हजार ७२१ कोटी इतका आहे. मात्र, या प्रकल्पासाठी पालिकेने समुद्र किनाऱ्यालगतचे नैसर्गिक पाण्याचे स्रोत, माशांचे प्रजनन स्थळ, प्रवाळ बेटे आणि पारंपरिक प्रवाह मार्ग बदलून भर समुद्रात भराव टाकला आहे. हा भराव हाजीअली आणि महालक्ष्मी मंदिर येथे सर्वाधिक म्हणजे १५० किलोमीटरपर्यंत आणि वरळी येथे १०० किलोमीटरपर्यंत टाकला आहे. शिवाय गिरगाव चौपाटीजवळ भुयारी मार्ग काढला आहे. कोस्टल रोडमुळे ७० टक्के वेळेची बचत होणार असून, ३४ टक्के इंधन बचत होईल, असा दावा पालिकेचा आहे.
कोस्टल रोडच्या दक्षिण भागाचे बांधकाम जवळपास २० टक्केच शिल्लक आहे. येत्या मार्चपर्यंत या मार्गातील वरळी ते मरीनलाइन्स बोगदा रस्त्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे, तसेच समुद्रभिंतीचे कामही ७९ टक्के झाले आहे. मात्र, या सर्व प्रकल्पासाठी पालिकेने भर समुद्रात भराव टाकून निर्माण केलेली जमीन १११ हेक्टर आहे. जी एकेकाळी मुंबईच्या खोल असलेल्या समुद्राचा एक भाग होती.
कोस्टल रोडसाठी आवश्यक असलेला भराव आम्ही समुद्रात केला आहे. त्यामुळे येथील समुद्री पर्यावरणाला तसेच सागरी जीवसृष्टीवर मोठा परिणाम होणार नाही. येथील प्रवाळांची व्यवस्था केली गेली आहे. सागरी भिंतीमुळे किनाऱ्याची धूप होण्यापासून संरक्षण होईल. वादळी लाटा व पुरापासूनही संरक्षण होईल तसेच किनाऱ्याचे नैसर्गिक रूपही कायम राहील.- मंतय्या स्वामी, मुख्य अभियंता, कोस्टल रोड प्रकल्प