अकरावी प्रवेशाचा ऑनलाइन अर्ज शाळांमधूनच भरा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 06:12 AM2019-05-28T06:12:54+5:302019-05-28T06:13:01+5:30
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे.
मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना आजपासून संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकेच्या मदतीने काळजीपूर्वक अर्ज भरावेत, असे आवाहन शिक्षण उपसंचालकांनी केले आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग आणि दुसरा भाग हा शाळेतूनच भरावा, त्यासाठी सायबर कॅफेची मदत घेऊ नये, असे आवाहन उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी केले आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी २०१९-२० या शैक्षणिक वर्षांसाठी एकूण ८४९ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली असून त्यामध्ये ३५ नवीन महाविद्यालयांचा समावेश आहे. अकरावी केंद्रीय आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा अर्ज दोन टप्प्यांमध्ये भरायचा आहे. यात अर्जाचा भाग-१ हा वैयक्तिक माहितीचा तर भाग-२ हा कनिष्ठ महाविद्यालयांच्या पसंतीक्रमांचा असणार आहे. अर्जाचा भाग-१ आता भरता येणार असून, भाग २ हा दहावीच्या आॅनलाइन निकालानंतर भरता येणार आहे.
मुखाध्यापक, तंत्रज्ञांची कार्यशाळा
विद्यार्थ्यांनी शाळांतूनच अर्ज भरावेत यासाठी मुख्याध्यापक, शाळेतील तंत्रज्ञ, लिपिक यांची कार्यशाळा उपसंचालक विभागातर्फे घेण्यात येत असते. या कार्यशाळेमार्फत मुखाध्यापक, शाळेतील तंत्रज्ञांनी विद्यार्थ्यांकडून अर्ज कसा भरून घ्यावा याचे प्रशिक्षण दिले जाते.
मुंबई विभागातील शिक्षक आणि मुख्यध्यापकांसाठी या कार्यशाळेचा दुसरा टप्पा २८ मे ते १ जूनदरम्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती अहिरे यांनी दिली. या कार्यशाळेला उपस्थित न राहणाऱ्या मुख्याध्यापक व अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
>अर्जाच्या भाग १ मध्ये काय भराल?
अर्जाचा भाग १ भरण्याची प्रक्रिया २७ मेपासून सुरू झाली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी शाळाशी संपर्क साधून माहिती पुस्तिका विकत घ्यायची आहे. त्यातील युनिक लॉगिन आयडी आणि पासवर्डचा वापर करून अर्जातील वैयक्तिक माहितीचा भाग भरून घ्यायचा आहे. पुस्तिका मिळाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांनी पुस्तिकेसोबत आलेला लॉग-इन आयडी वापरून संकेतस्थळावर आपले प्रोफाईल तयार करावे. त्यानंतर शक्यतो आपला पासवर्ड बदलून पुढील प्रक्रियांचा विचार करावा, अशा सूचना उपसंचालक कार्यालयाकडून दिल्या गेल्या आहेत.