Join us  

३ वर्षांत ४0 फेऱ्यांची भर

By admin | Published: December 04, 2015 1:53 AM

भावेश नकातेचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आणि त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा, तसेच सोईसुविधांचा प्रश्न पुन्हा समोर आला. त्यामुळे गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी व ठाणे ते कल्याण पट्ट्यातील

मुंबई: भावेश नकातेचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आणि त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा, तसेच सोईसुविधांचा प्रश्न पुन्हा समोर आला. त्यामुळे गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी व ठाणे ते कल्याण पट्ट्यातील प्रवास सुकर करण्यासाठी, लोकल फेऱ्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणीही होऊ लागली. मात्र, या पट्ट्यात गेल्या तीन वर्षांत फक्त ४0 लोकल फेऱ्यांची भर पडली आहे. डोंबिवलीत राहणाऱ्या २१ वर्षीय भावेश नकातेला गर्दीमुळे लोकलच्या डब्यात प्रवेश करता आला नाही आणि त्यामुळे दरवाजाजवळ लटकून प्रवास करताना, लोकलमधून पडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे लोकलमधील गर्दी, काही ग्रुप करून असणाऱ्या प्रवाशांची दादागिरीसह अन्य काही प्रश्न उपस्थित झाले आणि त्यामुळे प्रवास करणे कठीण असल्याची ओरड प्रवाशांसह खासदारांनी केली. त्यातच ठाणे ते कल्याण पट्ट्यात गर्दीतून प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी, लोकल फेऱ्याही वाढविण्यात याव्यात, अशी मागणीही होऊ लागली. ठाणे ते कल्याण पट्ट्यातील फेऱ्यांची माहिती घेतली असता, गेल्या तीन वर्षांत फक्त ४0 फेऱ्यांचीच भर पडल्याचे समोर आले आहे. दिवसाला जवळपास १५ लाख प्रवासी असतानाही, सध्या असणाऱ्या फेऱ्या या फारच कमी आहेत. २0११-१२ मध्ये ५१0 लोकल फेऱ्या होत होत्या.आता फेऱ्यांची हीच संख्या ५५0 असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. २0११-१२ नंतर तीन वर्षांत ४0 फेऱ्यांची भर पडली आहे. २0१३-१४ मध्ये लोकल फेऱ्यांची संख्या ही ५३३ एवढी होती. एकूणच प्रवाशांची संख्या आणि असणाऱ्या लोकल फेऱ्या पाहता, तुलनेने त्या फारच कमी असल्याचे दिसते.