बेस्टच्या आगारामध्ये आता भरा सीएनजी; घाटकोपर, गोरेगाव येथे सेवेला झाला प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 01:27 PM2023-06-05T13:27:22+5:302023-06-05T13:28:26+5:30
सर्वसामान्यांना किफायतशीर आणि दर्जेदार वाहतुकीची सेवा देणारी बेस्ट आता सर्वसामान्य वाहनचालकांना सीएनजी पुरविणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सर्वसामान्यांना किफायतशीर आणि दर्जेदार वाहतुकीची सेवा देणारी बेस्ट आता सर्वसामान्य वाहनचालकांना सीएनजी पुरविणार आहे. बेस्टच्या आगारात बाहेरच्या वाहनांनाही सीएनजी भरता येणार आहे. घाटकोपर आणि गोरेगाव येथील आगारात या सेवेचा प्रारंभ करण्यात आला असून लवकरच इतर आगारातही ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
बेस्ट प्रशासनाने पर्यावरणपूरक प्रवासाच्या दिशेने पावले उचलली आहेत. त्यासाठी आपल्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस दाखल केल्या आहेत. त्यापाठोपाठ बेस्टकडे सीएनजी बसही आहेत. मुंबईकरांसाठी बेस्टच्या आगारांमध्ये ‘सीएनजी’ डेपोची सुरुवात लवकरच होणार असून, बसमध्ये ‘तेज’ प्रकारे इंधनाचा पुनर्भरणा करता येणार आहे. यासाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) आणि महानगर गॅस लिमिटेड यांच्यात करार झाला आहे. पहिल्या टप्प्यात ही सेवा गोरेगाव आणि घाटकोपर आगारांमध्ये उपलब्ध असून शहरांमधील अन्य १३ आगारांमध्ये सुविधा सुरु होणार आहे.
तेज ॲपद्वारे करा स्लॉट बुक
बेस्टसोबत महानगर गॅस लिमिटेडने भागीदारीमध्ये घाटकोपर बस आगार येथे ‘एमजीएल तेज’ ॲप सुरू केले आहे. बेस्ट उपक्रमाचे माजी महाव्यवस्थापक लोकेश चंद्र आणि महानगर गॅस लिमिटेडचे संचालक सय्यद शाहनवाज हुसेन यांनी सीएनजी इंधन भरणा केंद्राचे उद्घाटन केले.
या प्रसंगी महानगर गॅस लिमिटेडचे उपव्यवस्थापकीय संचालक संजय शेंडे, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या सुविधेमुळे खासगी वाहनचालकांची सोय होणार आहे. अन्य आगारांमध्ये अशाच प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम सुरू आहे. खासगी वाहनांचीही सोय मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे खासगी चारचाकी सीएनजी वाहनचालकांना बेस्ट बस आगारांत सीएनजी भरण्यासाठी ठरावीक वेळ आरक्षित करणे शक्य होणार आहे.
खासगी सीएनजी वाहनधारकांना आठवड्यात कोणत्याही दिवशी सकाळी ९ आणि सायंकाळी ७ या वेळेत सीएनजी इंधन भरण्याकरिता वेळेचे आरक्षण करता येईल. सीएनजी भरणा केंद्राच्या ठिकाणी असणाऱ्या लांब रांगा यामुळे टाळता येणार आहे.