फरकाचे पैसे भरा अन् एसी लोकलची मजा घ्या! गर्दी वाढविण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:52 AM2018-01-10T00:52:21+5:302018-01-10T00:52:48+5:30
देशातील पहिल्या वातानुकूलित लोकलला अद्याप प्रवाशांचा पाहिजे तसा प्रतिसाद लाभलेला नाही. त्यातच प्रमथ दर्जाच्या प्रवाशांसह सामान्य मुंबईकरांच्या आवाक्यात वातानुकूलित लोकल नसल्याने पश्चिम रेल्वे चिंतेत आहे.
मुंबई : देशातील पहिल्या वातानुकूलित लोकलला अद्याप प्रवाशांचा पाहिजे तसा प्रतिसाद लाभलेला नाही. त्यातच प्रमथ दर्जाच्या प्रवाशांसह सामान्य मुंबईकरांच्या आवाक्यात वातानुकूलित लोकल नसल्याने पश्चिम रेल्वे चिंतेत आहे. त्यामुळे प्रथम दर्जाच्या पासधारकांना फरकाचे पैसे भरून प्रवास करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे.
सद्य:स्थितीत सर्वसामान्य १२ लोकल फे-यांच्या जागी वातानुकूलित लोकल धावते. वातानुकूलित लोकलचे दर प्रथम दर्जापेक्षा अधिक आहेत. या लोकल प्रवासासाठी पास किंवा तिकीट काढूनच प्रवाशांना प्रवास करणे शक्य आहे. पिक अवरमध्येदेखील वातानुकूलित फे-या आहेत. यामुळे प्रथम दर्जाच्या पासधारक प्रवाशांना फरकाचे पैसे भरून एसी लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने बोर्डाकडे पाठवला आहे.
प्रवाशांची प्रतीक्षा
वातानुकूलित लोकल सुरू होऊन १५ दिवस झाले. २५ नोव्हेंबर ते ८ जानेवारी या काळात रोज सरासरी ४१० तिकिटांची विक्री झाली, तर ३ हजार ५७४ प्रवासी रोज प्रवास करतात. या लोकलचे उत्पन्न सरासरी १ लाख ५१ हजार ३२१ रुपये आहे. मुळात वातानुकूलित लोकल क्षमता ६ हजार प्रवाशांची आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार निम्मी एसी लोकल अद्याप प्रवाशांच्या प्रतीक्षेत आहे. बोर्डाकडून मंजुरी देण्यात आल्यावर फरकाच्या रकमेसाठी पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली.