मिठीत भराव; मुंबई धोक्यात; नदीच्या भर पात्रातच बांधला बेकायदेशीर रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 10:41 AM2023-04-26T10:41:37+5:302023-04-26T10:42:25+5:30

पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करून नदीच्या भर पात्रात बांधला रस्ता

Fill in the hug; Mumbai in danger; The road was built in the course of the river | मिठीत भराव; मुंबई धोक्यात; नदीच्या भर पात्रातच बांधला बेकायदेशीर रस्ता

मिठीत भराव; मुंबई धोक्यात; नदीच्या भर पात्रातच बांधला बेकायदेशीर रस्ता

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोणत्याही कारणास्तव नदीचे नैसर्गिक प्रवाह रोखू अथवा वळवू नयेत, अशा राष्ट्रीय हरित लवादाच्या स्पष्ट सूचना असतानाही मिठी नदीच्या पात्राचे रुंदीकरण करणाऱ्या कंत्राटदाराने कामासाठी नदीच्या पात्रातच रस्ता बांधण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या भरावामुळे नदीतील जैवविविधता धोक्यात आली असून, पावसाळ्याआधी हा भराव काढला न गेल्यास मुंबई पुन्हा तुंबण्याची भीती पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

महापालिकेच्या के/पूर्व, एल आणि एस वार्डमधील अशोकनगर, अंधेरी ते फिल्टरपाडा आणि पवई या भागांतील मिठी नदीच्या पात्राचे रुंदीकरण, खोलीकरण, लगतची संरक्षक भिंत आणि सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी कंत्राटदार कंपनीला १२८ कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. अशा कामासाठी पर्यावरणासंबंधित सर्व परवानग्या त्या-त्या प्राधिकरणांकडून मिळवण्याची जबाबदारीही महापालिकेने कंत्राटदार कंपनीवर सोपवली आहे. तशी अट महापालिकेने निविदेतच घातली आहे. हा भराव इतका प्रचंड आहे की, येत्या पावसाळ्यापूर्वी तो कसा काढला जाईल हा गंभीर प्रश्न आहे. काम झाल्यावर कंत्राटदार भराव काढत नाहीत, असा मुंबईकरांना नेहमीचा अनुभव आहे. तसे झाल्यास येत्या पावसाळ्यात मिठी नदी तुंबून २००५ सालाप्रमाणे मुंबईची तुंबई होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती राेहन सावंत यांनी व्यक्त केली आहे. 

कामासाठी तात्पुरता रस्ता
 या कंत्राटदार कंपनीने नदीच्या पात्रातच प्रचंड माेठा भराव टाकून रस्ता तयार केला आहे. पुढील काम करण्यासाठी हा  तात्पुरता रस्ता बांधण्यात आल्याचे महापालिका अधिकारी सांगत आहेत. 
 नदीच्या पात्रात असा रस्ता कसा बांधण्यात आला? अशा भरावामुळे नदीतील पान वनस्पती, नैसर्गिक साखळीतील घटक नष्ट होतात. त्यामुळे नदी म्हणून असलेले नदीचे अस्तित्व धोक्यात आले असून, त्याचा नालाच करण्यात आला आहे, असा आरोप ‘मनसे’चे अंधेरी विधानसभा अध्यक्ष रोहन सावंत यांनी केला आहे. 
  भरावासाठी कंत्राटदाराने एमएमआरडीए, महाराष्ट्र सागरी विभाग व्यवस्थापन प्राधिकरण, मिठी नदी विकास आणि संरक्षण प्राधिकरण, पर्यावरण आणि वन मंत्रालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानग्या घेतल्या असल्यास त्या उघड कराव्यात, असे नमूद करीत सावंत यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले.

मिठी नदीमध्ये भराव टाकून तयार करण्यात आलेला रस्ता हा नवीन मशिनरी आत उतरविण्यासाठी तसेच इतरत्र हलवण्यासाठी बांधण्यात आला आहे. मिठी नदीचे काम पूर्ण झाल्यावर हा भराव, रस्ता काढला जाईल.
- पी. वेलरासू, 
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) 

वास्तविक, मिठी नदीच्या रुंदीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने नेमके उलट काम केले आहे. नदीपात्रात भराव न घालता काम कसे करता येईल, याबाबत सर्व्हेच झाला नसल्याचे यातून उघड होते. यामुळे नदी प्रदूषितही झाली आहे. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करून  नदीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले अधिकारीच भराव टाकल्याचे मान्य करीत आहेत. नदी धोक्यात आणल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हे का दाखल होऊ नयेत. 
-रोहन सावंत, अध्यक्ष, मनसे अंधेरी विभाग

Web Title: Fill in the hug; Mumbai in danger; The road was built in the course of the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.