नाराज अपक्षांच्या मनपरिवर्तनावर भर

By Admin | Published: February 5, 2017 04:30 AM2017-02-05T04:30:01+5:302017-02-05T04:30:01+5:30

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम दिवशी राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून २ हजार ७१८ अर्जांची नोंद झाली असतानाच उमेदवारी मिळाली नाही म्हणून अपक्ष उमेदवारी दाखल

Fill the mindset of angry candidates | नाराज अपक्षांच्या मनपरिवर्तनावर भर

नाराज अपक्षांच्या मनपरिवर्तनावर भर

googlenewsNext

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम दिवशी राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून २ हजार ७१८ अर्जांची नोंद झाली असतानाच उमेदवारी मिळाली नाही म्हणून अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांची नाराजी दूर करण्यासाठीची खलबते आता सुरू झाली आहेत. विशेषत: बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवाराची मनधरणी करण्यात येत असून, यात आता राजकीय पक्षांना किती यश येते? याचे चित्र मात्र ७ फेब्रुवारी रोजीच स्पष्ट होणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय, सपा आणि एमआयएमसारखे तगडे पक्ष मैदानात उतरले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीसह आरपीआय, सपा आणि एमआयएममध्ये बंडखोरीचे प्रमाण कमी असले तरी शिवसेना आणि भाजपामध्ये अनेकांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारीमध्ये ‘मराठी’ उमेदवारांना डावलण्यात आल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे. महत्त्वाचे म्हणजे उमेदवारी मिळाली नसल्याने भाजपाच्या अनेकांनी विधानसभा, वॉर्ड आणि प्रभागस्तरावर नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेनेचे दुखणे वेगळेच असून, उमेदवारी डावलण्यात आल्याने अनेक नाराजांनी भाजपात प्रवेश केला आहे. काहींनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. मुळात भाजपा आणि शिवसेनेमध्येच नाराजांची संख्या अधिक असून, नाराजी दूर करण्यासाठी विभागस्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. तर अपक्ष उमेदवारांमुळे मते विभागली जाण्याची भीती शिवसेना आणि भाजपा या दोघांनाही असल्याने अपक्ष उमेदवारांची मने वळवण्यावर रविवारसह सोमवारी जोर देण्यात येणार आहे.
प्रचार आणि प्रसाराचा आजचा रविवार पहिलाच असल्याने या दिवशी प्रचाराला आणखी रंगत येणार आहे. या रंगतदार निवडणुकीमध्ये रविवारसह सोमवारी विभागस्तरावर खासगी बैठकांनाही ऊत येणार आहे. शिवाय गाठीभेटी होणार असून, या गाठीभेटीमध्ये वॉर्ड अध्यक्ष, विभागप्रमुख, प्रभागप्रमुख असे अनेक चेहरे नाराजी दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका वठवणार आहेत. एकंदर अपक्ष उमेदवारासह नाराजीमुळे मत विभागले जाऊ नये; याची काळजी विशेषत: शिवसेना आणि भाजपा घेणार असून, ७ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)

बंडखोर, अपक्षांची संख्या वाढली
शनिवारी उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस होता. परिणामी या दिवशी बंडखोरांची आणि अपक्षांची संख्या वाढली. राजकीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार मागील महापालिकेच्या निवडणुकीतील अपक्षांच्या तुलनेत यंदा अपक्षांची संख्या तुलनेने कमी असली तरीदेखील ‘अपक्ष’ तापदायक ठरणार आहेत. हाच ‘ताप’ शेवटपर्यंत कायम राहू नये म्हणून राजकीय पक्षांकडून नाराजांसह अपक्षांची मनधरणी करण्यात येणार आहे.
वरळी येथील बंडखोरी आणि अपक्ष म्हणून दाखल झालेली उमेदवारी, अ‍ॅण्टॉप हिल येथील शिवसैनिकांमधील नाराजी, लालबाग येथील बंडखोरीसह पक्षांतर, घाटकोपर येथील राजकीय हवेदावे, कुर्ला-कालिनामधील गटबाजी, बोरीवलीसह दहिसर येथील पक्षांतर आणि कुरघोडीचे राजकारण; अशा सगळ्या पार्श्वभूमीवर अपक्षांची ताकदही निवडणुकीत दिसणार आहे.
बंडखोरीसह अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या मागे कार्यकर्त्यांची मोठी ताकद आहे. मात्र उमेदवाराच्या बंडखोरीसह पक्षांतरामुळे कार्यकर्त्यांची फरफट होत असून, कार्यकर्तेही विभागले जात आहेत. परिणामी ऐन प्रचार-प्रसारासह व्यवस्थापनासाठी कार्यकर्त्यांचा फौजफाटा कमी पडू नये म्हणून राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत.

Web Title: Fill the mindset of angry candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.