Join us

चार दिवसात खड्डे बुजवा, अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन कॉंग्रेसचा पालिकेला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 2:17 PM

शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्यांच्या मुद्यावरुन आता कॉंग्रेसही आक्रमक झाली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी शहर कॉंग्रेसच्या वतीने पालिकेला अल्टीमेटन देण्यात आले आहे. चार दिवसात खड्डे बुजविले नाही, तर आंदोलन केले जाईल असा इशाराही कॉंग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.

ठाणे : येत्या काही दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. परंतु अद्यापही रस्त्यावरील खड्डे तसेच आहेत. दरवर्षी खड्डे बुजविण्याच्या नावाखाली कोट्यावधींची उधळपटटी केली जाते. मात्र रस्त्यावर खडड्े हे तसेच राहत आहेत. त्यामुळे आता येत्या चार दिवसात रस्त्यावर सर्वच खड्डे बुजवा अन्यथा कॉंग्रेस रस्त्यावर उतरुन या खड्यांच्या विरोधात आंदोलन करेल असा इशारा कॉंग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. तसेच एमएसआरडीसीने देखील शहरातील पुलांवर पडलेले खड्डे तत्काळ बुजवावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.                   दरवर्षी पावसाळा येतो आणि दरवर्षी शहरातील रस्त्यांना खड्डे पडतात. आता तर गणेशोत्सव अवघा एक आवड्यांवर येऊन ठेपला आहे. असे असतांनाही शहरातील विविध भागात रस्त्यांना खड्डे पडल्याचे दिसत आहे. दरवर्षी खड्डे बुजविण्यासाठी कोट्यावधींचा निधी खर्ची केला जात आहे. यंदा देखील खड्डे बुजविण्यासाठी २ कोटीहून अधिकची तरतूद केली आहे. परंतु खड्डे बुजविल्यानंतरही पुन्हा खड्डे पडत आहे. यंदा कोरोनामुळे शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळही कमी दिसून आली आहे. असे असतांनाही शहरातील माजिवडा नाका, कापुरबावडी नाका, तिनहात नाका आदींसह शहरातील इतर महत्वांच्या रस्त्यांना खड्डेच खड्डे असे चित्र आहे. दरम्यान यापूर्वी प्रशासनाने यापुढे रस्त्यांना खड्डे पडणार नाहीत, या अनुषंगाने रस्ते बांधणीचे नियोजन केले होते. यासाठी कोट्यावधीची तरतूदही करण्यात आली होती. त्यानंतर रस्ते बांधणीचे कामही सुरु झाले. परंतु या नवीन रस्त्यांनाही खड्डे पडले आहेत. त्याला जबाबदार कोण, ठेकेदार की पालिकेचे चुकलेले नियोजन या प्रश्नाचे उत्तर कोण देणार आहे. ठेकेदाराकडून चुक झाली असेल तर त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.आता येत्या आठ दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. तरीसुध्दा शहरातील रस्त्यांवर खड्डे दिसत आहेत. त्यामुळे येत्या ४ दिवसात खड्डे बुजविण्यात यावेत अन्यथा कॉंग्रेस आपल्या स्टाईलने या विरोधात रस्त्यावर उतरुन अनोख्या पध्दतीने आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.दुसरीकडे शहरातील तिनहात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी तसेच घोडबंदरकडे जाण्यासाठी असलेले कापुरबावडी, मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ येथील एमएसआरडीसीच्या अख्यत्यारीत असलेल्या उड्डाणपुलावरील खड्डे बुजविण्यासाठी संबधींत यंत्रणेला सांगावे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु, या उड्डाणपुलावरील खड्डे पालिकेने बुजवू नयेत अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. मागील वर्षी तीनहात नाक्यावरील उड्डाणपुलावरील खड्डे बुजविण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्यासाठी ६० लाखाहून अधिकचा खर्च करण्यात आला होता. परंतु त्याचे देयक अद्यापही एमएसआरडीसीकडून देण्यात आलेले नाही. त्यामुळे हे बील देखील संबधींत यंत्रणेकडून तत्काळ वसुल करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली. 

टॅग्स :ठाणेठाणे महापालिकाकाँग्रेस