दोन दिवसांत माहिती भरून द्या; शिक्षण उपसंचालकांच्या आदेशामुळे शाळांमध्ये गोंधळाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 07:57 AM2024-01-25T07:57:29+5:302024-01-25T07:58:00+5:30
एक तर १ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान राबविल्या जाणाऱ्या या अभियानाचे आदेशच मुळात मुंबईतील शाळांना विलंबाने म्हणजे दोन दिवसांपूर्वी मिळाले.
मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत अवघ्या दोन दिवसांत माहिती भरून देण्याच्या मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या आदेशामुळे मुंबईतील शाळांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
एक तर १ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान राबविल्या जाणाऱ्या या अभियानाचे आदेशच मुळात मुंबईतील शाळांना विलंबाने म्हणजे दोन दिवसांपूर्वी मिळाले. त्यात आता दोन दिवसांत नोंदणी पूर्ण करण्याची सक्ती शाळांना करण्यात येत आहे. ‘ही माहिती ऑनलाइन भरायची आहे. त्यात ४५ विविध प्रकारच्या उपक्रमांची माहिती देणे अपेक्षित आहे. कोणते उपक्रम राबविले, हे विस्तृतपणे लिहायचे आहे. शिवाय फोटोही जोडायचे आहेत.
आपली कामगिरी वधारण्यासाठी अभियानाच्या ४५ दिवसांच्या काळात शाळांना उपक्रम घ्यायचे आहेत. मात्र, दोन दिवसांत सर्व माहिती भरून नोंदणी पूर्ण कशी करायची आणि त्यात उपक्रम घेऊन कामगिरी कशी वधारायची,’ अशा शब्दांत एका मुख्याध्यापकांनी आपली अडचण मांडली.याबाबत मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपल्या कार्यालयाकडून अशी काही सूचना दिली गेली असल्यास माहिती घेऊन कळवतो, असे सांगितले.
२१ लाखांचे पारितोषिक
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत हे अभियान राबविले जात आहे. यात ४७८ शाळांचा पहिल्या टप्प्यात सहभाग असेल. सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या शाळांची पहिल्या तीन क्रमांकासाठी निवड होईल. महापालिका क्षेत्रातील शाळांना पहिले २१ लाखांचे, दुसरे ११ लाखांचे तर तिसरे सात लाखांचे पारितोषिक मिळणार आहे.
माहिती काय भरायची?
सुरुवातीला शाळेविषयीची सर्व माहिती भरायची आहे. त्यानंतर ६० आणि ४० गुणांचे अनुक्रमे अ आणि ब असे दोन भाग भरायचे आहेत.
उदाहरणार्थ अ भागात विद्यार्थिकेंद्री उपक्रमांचे आयोजन, विद्यार्थ्यांचा सहभाग या अंतर्गत वर्ग, शाळा सजावट, वृक्षारोपण, संरक्षक इमारतीची रंगरंगोटी, बोलक्या भिंती इत्यादी उपक्रमांची माहिती, फोटो जोडायचे आहेत. असे एकूण सहा गट आहेत. तर ब भागात शाळा व्यवस्थापनाकडून आयोजिण्यात आलेले उपक्रम व विविध घटकांचा सहभाग ही माहिती पाच गटात द्यावयाची आहे.