मुंबई : अवघ्या मुंबईला खड्डयात लोटणारी मुंबई महापालिका आता खडबडून जागी झाली असून, मुंबई शहर आणि उपनगरांतून तक्रार दाखल होणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. ‘लोकमत’ने मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे वास्तव सांगत नागरिकांची व्यथा मांडली होती. मुंबई महापालिकेने आदेश दिले. अन्य महापालिका कधी जाग्या हाेणार, असे नागरिक विचारत आहेत.
- रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी ४८ तासांची मुदत असली, तरी कोल्डमिक्स तंत्रज्ञानाद्वारे २४ तासांतच खड्डे भरण्याचे प्रयत्न केले जात आहेत आणि त्यासाठी महापालिकेने स्थापन केलेली पथके समन्वय साधत आहेत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पी वेलरासू यांनी दिली.
- खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेच्या २४ विभागांना सुमारे २ हजार ४२२ मेट्रिक टन ड्राय कोल्ड मिक्स पुरवण्यात आले आहेत.
- दरम्यान, मुंबईतील अन्य शासकीय प्राधिकरणांनी त्यांच्या ताब्यातील रस्त्यांची देखभाल करावी, असेही वेलरासू यांनी स्पष्ट केले.
खड्डे ४८ तासांत भरणारमुंबईतील रस्त्यांवर पडलेले खड्डे पुढील ४८ तासांत पूर्ववत करण्यात यावेत, या मागणीसाठी भारतीय जनता शिष्टमंडळाने आमदार मिहीर कोटेचा यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी आयुक्तांनी रस्त्यांवरील खड्डे ४८ तासांत भरण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे.
२१ हजार कोटी खर्चमुंबई शहरात गेल्या २० वर्षांत २१ हजार कोटी रस्ते बनविण्यासाठी खर्च करण्यात आले. मात्र तरीही प्रत्येक पावसाळ्यात मुंबईकरांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो. परिणामी मुंबईतील नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो. वाहनांचा खोळंबा होतो. याही पावसाळ्यात मुंबईतील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.