कचऱ्यातून निघणाऱ्या सोन्यावर भरते त्यांचे पोट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:07 AM2021-09-27T04:07:05+5:302021-09-27T04:07:05+5:30
मुंबई : एखाद्या सोनाराच्या दुकानाबाहेर किंवा सराफा बाजाराच्या बाहेर पहाटेच्या वेळेस काही महिला झाडू मारत अथवा माती जमा करत ...
मुंबई : एखाद्या सोनाराच्या दुकानाबाहेर किंवा सराफा बाजाराच्या बाहेर पहाटेच्या वेळेस काही महिला झाडू मारत अथवा माती जमा करत बसलेल्या पाहायला मिळतात. या महिला दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून त्यांना झारेकरी म्हटले जाते. सोनाराच्या दुकानाशेजारी जमलेल्या कचऱ्यातून सोने काढून त्या महिला आपला उदरनिर्वाह करतात.
शहरातील दुकानांच्या बाहेर व आतमध्ये या महिला मोफत झाडू मारतात. झाडून जमा झालेला कचरा तसेच माती स्वतःकडे एकत्र करतात. नंतर या महिला या मातीमधून सोन्याचे बारीक तुकडे तसेच चुरा वेचून काढतात. सोनाराच्या दुकानात सोन्याचे दागिने घडविताना किंवा त्यांना पॉलिश करताना सोन्याचे काही कण मातीत पडतात. हे कण सोनार वापरत नाहीत. मात्र, झारेकरी हे कण शोधून दिवसाला कमीत कमी ५०० ते ७०० रुपये किमतीचे सोने जमा करतात. दिवसाला १०० ते ५०० मिली ग्रॅम सोने जमा होत असल्याने झारेकऱ्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य हे काम करतात.
कचऱ्याच्या मातीतून किती मिळते सोने?
सोनाराच्या दुकानाच्या बाहेर झाडू मारल्यानंतर संपूर्ण कचऱ्यामधून व मातीमधून सोन्याचे कण निवडले जातात. झारेकरी हे कण शोधून दिवसाला कमीत कमी ५०० ते ७०० रुपये किमतीचे सोने जमा करतात. दिवसाला १०० ते ५०० मिली ग्रॅम सोने जमा होत असल्याने झारेकऱ्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य हे काम करतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काही वेळा त्यांचे हे काम थांबते. मात्र, हिवाळा व उन्हाळ्यात हे काम सुरू असते. असे सोनाराच्या दुकानाबाहेर काम करणाऱ्या महिलेचे म्हणणे आहे.
फक्त कचरा नेतात, सोने सापडले तर परत करतात !
कचऱ्यातून सोने निवडणारे झारेकरी आपल्या कामाच्या बाबतीत प्रामाणिक असल्याचे अनेक सराफ व्यापाऱ्यांचे मत आहे. अनेकदा सोनाराच्या दुकानात पैंजण, नथ, कानातले दागिने बनविताना सोन्याचे तुकडे जमिनीवर पडून दिसेनासे होतात. अशावेळी झारेकऱ्यांना असे सोने सापडल्यास ते प्रामाणिकपणे व्यापाऱ्यांना परत करतात, असे सराफा व्यापारी कांतिलाल देढीया यांनी सांगितले.
स्टार १२२२