फिल्म सिटीत ‘नो कॅमेरा, नो अॅक्शन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 05:47 AM2017-08-17T05:47:55+5:302017-08-17T05:47:55+5:30
गेल्या तीन दिवसांपासून गोरेगाव फिल्म सिटीमध्ये ‘नो कॅमेरा, अॅक्शन’ चे वातावरण आहे.
मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून गोरेगाव फिल्म सिटीमध्ये ‘नो कॅमेरा, अॅक्शन’ चे वातावरण आहे. विविध मागण्यांसाठी फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने एप्लॉइजने संप पुकारला आहे. या संपात एकूण २२ युनियन्सचा समावेश आहे. स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या रात्रीपासून हा संप सुरू आहे.
फिल्म सिटी परिसरात बुधवारी संपकºयांच्या घोषणांमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. कामाचे तास, योग्य कंत्राट करून कामाचा मोबदला, ओव्हर टाइम, कामाच्या निश्चित वेळा, विमा, खाण्या-पिण्याची सोय यांसारख्या विविध मूलभूत विषयांवरून गेले तीन दिवस फिल्म सिटीमध्ये चित्रपट आणि टेलिव्हीजन कामगारांनी फिल्म सिटी समोर आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी संपाचा तिसरा दिवस होता. संपा वेळी काही कामगार काम करत असल्याची माहिती संपकºयांना मिळाल्यानंतर त्यांची समजूत काढायची आहे, असे म्हणत त्यांनी गेटच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला.
हा संप आम्हा सर्वांच्याच भल्यासाठी असल्याचे संपकºयांनी म्हटले आहे. या संपात टेक्निशिअनपासून स्पॉटबॉयपर्यंत सर्वांचा समावेश आहे; पण आत शिरण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. यावेळी एका निर्मात्याला धक्काबुक्की झाल्याचेही समजले.
या संपामुळे ३७ मोठ्या मालिकांचे चित्रीकरण अडकल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. निर्माते कामगारांचे हक्क मारुन त्यांच्यावर अत्याचार करतात, असे या फेडरेशनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी आणि सचिव पिठवा यांचे म्हणणे आहे. १७ आॅगस्टला देखील हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.