कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे चित्रपट महामंडळाचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:06 AM2021-03-15T04:06:07+5:302021-03-15T04:06:07+5:30
मुंबई : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन ...
मुंबई : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. चित्रपट क्षेत्रातील निर्माते, तंत्रज्ञ, कलावंत, कामगार; तसेच चित्रपट क्षेत्राशी संबंधित विविध सेवा पुरवठादार यांच्यासाठी चित्रपट महामंडळाने त्याबाबतची नियमावली जाहीर केली आहे.
जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांची लेखी परवानगी घेऊनच चित्रीकरण करावे. चित्रीकरण स्थळी शक्य तितकी कमी टीम ठेवावी. सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे. सेटवर सॅनिटायझर, टेम्परेचर गन, ऑक्सिमीटर असणे आवश्यक आहे; तसेच याबाबतीत प्रत्येकाची रोज लेखी नोंद ठेवणे आवश्यक आहे. युनिटमधील कोणाच्याही जवळचे किंवा शेजारी, कोरोना रुग्ण असतील तर संबंधित व्यक्तीची कोरोना चाचणी करून रिपोर्ट जवळ बाळगावा. जास्त दिवस चित्रीकरण असेल तर सगळ्यांची कोरोना टेस्ट करून घेणे बंधनकारक आहे. चित्रीकरण साहित्य वरचेवर सॅनिटाइझ करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञ व कामगार वर्गाने हँड ग्लोव्हज, फेसशिल्ड वापरावी. चहापाणी, न्याहारी, जेवण यासाठी ‘यूज अँन्ड थ्रो’; परंतु पर्यावरणपूरक साहित्य वापरावे. चित्रपट महामंडळाच्या भरारी पथकातील सदस्य पाहणी करण्यासाठी आले तर त्यांना सहकार्य करावे, अशा सूचना चित्रपट महामंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिल्या आहेत.