मुंबई : समाजात समलैंगिकांना नेहमीच विषमतेची वागणूक दिली जाते. त्यामुळे लैंगिक विषमता रोखण्यासाठी चित्रपट प्रभावी माध्यम ठरू शकते, असे प्रतिपादन अभिनेत्री नंदिता दास यांनी केले. मंगळवारी आयआयटी बॉम्बे येथे ‘लिंग आणि लैंगिकता’ या विषयावर दक्षिण आशियाई परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दास यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.नंदिता दास म्हणाल्या की, चित्रपट लोकांची मानसिकता बदलण्यासाठी प्रभावी माध्यम ठरते. त्यामुळे लैंगिकतेसारख्या विषयावर चांगले चित्रपट तयार केले तर लोकांच्या मनातील गैरसमज दूर होतील. परंतु, भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये लैंगिकता या विषयावर खूपच कमी चित्रपट तयार केले जातात. या विषयावरील चित्रपटांचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे.स्वानुभव सांगताना त्या म्हणाल्या, मी समलैंगिकतेवर आधारित असलेल्य ‘फायर’ हा चित्रपट केला. तेव्हा मला यापुढे चित्रपट मिळेल की नाही याबाबत शंका होती. भारतीय समाज या चित्रपटाला स्वीकारेल का, असाही प्रश्न होता. याच पठडीतले अधिक चित्रपट केल्यामुळे अनेक जण माझ्याकडे संशयाने पाहतात.मला विचारतात की, तू लैंगिकतेवर आधारित चित्रपट का करतेस? तू अशा प्रकारच्या चित्रपटांच्या कथांना इतक्या सरळ कशी काय हाताळू शकतेस, अशा वेळी लोकांच्या विचारांची कीव येते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.या परिषदेत साथी या संस्थेचे सदस्य आदित्य जोशी, अभिनेते जिम सर्भ, दिग्दर्शक ओनीर, प्राध्यापिका शाहिनी घोष, मानवाधिकार कार्यकर्त्या विंदा ग्रोवर उपस्थित होत्या.सात वर्षे वाट पाहिलीदिग्दर्शक ओनीर म्हणाले की, लैंगिकतेवरील चित्रपटांना सर्व जण स्वीकारत नाहीत. ‘माय ब्रदर निखिल’ या माझ्या चित्रपटाला टेलिव्हिजनवर दाखविण्यासाठी मला सात वर्षे वाट पाहावी लागली. प्रेक्षकही कमी होते. ताकदीच्या कथा असलेले चित्रपट तयार करून प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे वळवायला हवे.प्रबोधनाची गरजअभिनेते जिम सर्भ म्हणाले की, भारतीय समाज समलैंगिकांकडे तिरकस नजरेने पाहतो. ती नजर बदलण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. चित्रपट, साहित्य आणि माध्यमे लोकांचे प्रबोधन करू शकतात. त्यासाठी दिग्दर्शक, अभिनेत्यांनी पुढे यायला हवे.अधिकचे अधिकार हवेतमानवाधिकार कार्यकर्त्या विंदा ग्रोवर म्हणाल्या की, सर्वांना समाजात समान हक्क आहेत. ‘सर्व’ या शब्दात समलैंगिकही आले. त्यांना त्यांचे अधिकार मिळायला हवेत. त्यांनाही समाजात योग्य वागणूक मिळायला हवी. चित्रपट, मालिका हे माध्यम लोकांची मानसिकता बदलेल.
लैंगिक विषमता रोखण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम - नंदिता दास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 1:10 AM