मुंबई - आपल्या सोज्ज्वळ दिसण्यानं आणि वात्सल्यपूर्ण अभिनयानं सिनेप्रेमींच्या मनात घर करणाऱ्या, मराठी सिनेमांमध्ये नायिका म्हणून स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या आणि बॉलिवूडच्या पडद्यावर आई म्हणून मान मिळवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सुलोचनादीदींची प्राणज्योत आज मालवली. गेल्या महिन्यात त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ९ मे रोजी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, काल रात्री प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातील दिग्गजांकूडन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. तसेच, त्यांच्या आठवणही जागवल्या जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुलोचना दिदींच्या ६ दशकातील प्रवासाचे वर्णन करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. रुपेरी पडद्यावर त्यांनी साकारलेल्या सात्त्विक, सोज्वळ अशा वात्सल्यमूर्ती आईच्या भूमिका कोट्यवधी रसिकांच्या मनात घर करून आहेत. त्यांच्या निधनाने सकस आणि निरागस अभिव्यक्तीपासून चित्रपटसृष्टी पारखी झाली आहे. पद्मश्री स्व. सुलोचना लाटकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे ट्विट शरद पवार यांनी केले. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे.
सुलोचना दिदींच्या जाण्याने अभिनय क्षेत्रातील एक असामान्य व्यक्तीमत्व हरपले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच लाटकर कुटुंबातील सदस्य आणि सुलोचना दीदींच्या चाहत्यांना या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देवो हीच प्रार्थना, असे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवरुन आठवणी जागवत दीदींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्याही काळात आघाडीच्या अभिनेत्री म्हणून त्यांनी मोठा कालखंड गाजवला आणि त्यानंतर सुद्धा सातत्याने विविध भूमिका त्यांनी साकार केल्या. जवळजवळ 50 हून अधिक वर्ष त्यांनी चित्रपटाचा पडदा गाजविला. व्यक्तिरेखा हुबेहूब जिवंत करणाऱ्या वात्सल्यमूर्ती आणि एका महान कलावंताला आज आपण सारे मुकलो आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, सुलोचना दिदींच्या निधनाच्या वृत्तानंतर बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रातील दिग्गजांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही, "रुपेरी पडद्यावरच्या सहजसुंदर अभिनयानं सिनेरसिकांना आई, बहिण, वहिनीच्या नात्याचं ममत्व देणाऱ्या सुलोचना दीदींच्या निधनानं भारतीय सिनेसृष्टीतील समृद्ध युगाचा अंत झाला आहे, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
सुमारे सात दशके आपल्या अभिनयाने मनोरंजन करणाऱ्या सुलोचना लाटकर ह्या मनोरंजन जगतात आणि चाहत्यांमध्ये सुलोचना दीदी या नावाने परिचित होत्या. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. सुलोचनादीदींनी २५० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. सुरुवातीच्या काळात त्यांना भालजी पेंढारकर यांचं मार्गदर्शन लाभलं होतं. पद्मश्री, तसेच महाराष्ट्र भूषण या पुरस्कारांनी सन्मानित करून त्यांच्या अभिनयाचा गौरव करण्यात आला होता.