फिल्म सेटिंग अँड अलाईड मजदूर युनियनच्या मुख्य कार्यालयाला ठोकणार टाळे 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 06:50 PM2021-07-07T18:50:04+5:302021-07-07T18:50:57+5:30

मनसे चित्रपट सेनेचा खंडणीखोर युनियनला पहिला दणका

Film Setting and Allied Workers Unions headquarter to be closed | फिल्म सेटिंग अँड अलाईड मजदूर युनियनच्या मुख्य कार्यालयाला ठोकणार टाळे 

फिल्म सेटिंग अँड अलाईड मजदूर युनियनच्या मुख्य कार्यालयाला ठोकणार टाळे 

Next

मुंबई :- कला दिग्दर्शक राजेंद्र सापते यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या फिल्म सेटिंग अँड अलाईड मजदूर युनियनच्या चार फरारी आरोपींना लवकरच जेरबंद करू अस आश्वासन उत्तर मुंबई विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त  दिलीप सावंत आणि उपायुक्त स्वामी यांनी मनसे चित्रपट सेनेच्या कार्याध्यक्ष शालिनी ठाकरे यांना आज दिले. या संघटनेच्या कार्यालयातून या घटनेचे पुरावे नष्ट केले जाऊ नयेत यासाठी या कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. राजेंद्र सापते यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे चित्रपट सेनेने आज याबाबत त्यांची भेट घेऊन ही मागणी केली होती.  

राजेंद्र सापते यांच्या आत्महत्येनंतर हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, कला दिग्दर्शक आणि इतर तंत्रज्ञ आणि कलाकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी या संघटनेचा बंदोबस्त करण्याचं आश्वासन या सगळ्यांना दिलं होतं. त्यानुसार आज लगेचच मनसे चित्रपट सेनेने पत्र लिहून उत्तर मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राजेंद्र सापते यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या नरेश विश्वकर्मा उर्फ (मिस्त्री), गंगेश्वर श्रीवास्तव उर्फ (संजुभाई), राकेश मौर्या, अशोक दुबे या चार आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. त्यासोबतच या संघटनेच्या कार्यालयातून या धमक्या दिल्या जात असल्याने पुरावे नष्ट करण्याची शक्यता लक्षात घेता हे कार्यालयाला टाळे ठोकावे, तसेच या संघटनांकडून सुरू असलेली व्हिजिलन्स स्क्वॅडवर कारवाई करून त्यात सहभागी असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन पोलिसांना देण्यात आले. 

यावर या सर्व मागण्यांचा विचार करून सर्व आरोपींवर कारवाई करूच, त्यासोबत या कार्यालयाला देखील टाळे ठोकू असं आश्वासन अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत आणि उपायुक्त स्वामी यांनी मनसे चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलं. 

 युनियनच्या माध्यमातून सुरू असलेली दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालल्याने ती समूळ संपवण्यासाठी या युनियनची तक्रार धर्मादाय आयुक्तांकडे करून सदर युनियनची मान्यता रद्द करण्याची मागणी करावी असेही स्वामी यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना सुचवले. यानुसार मनसे चित्रपट सेनेच्या वतीने कार्याध्यक्ष शालिनी ठाकरे लवकरच धर्मदाय आयुक्तांकडेही तक्रार दाखल करणार असल्याचे या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. 

यावेळी मनसे चित्रपट सेनेचे सरचिटणीस शशांक नागवेकर संयुक्त सरचिटणीस विशाल हळदणकर, संयुक्त सरचिटणीस संदीप सावंत तर उपाध्यक्ष सचिन चव्हाण आणि उपाध्यक्ष अवधूत चव्हाण हेही उपस्थित होते.

Web Title: Film Setting and Allied Workers Unions headquarter to be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.