नियमांचे उल्लंघन; अभिनेत्री गौहर खानविरोधात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाबाधित असूनही सार्वजनिक ठिकाणी फिरणे, तसेच चित्रीकरणात सहभागी होणे अभिनेत्री गौहर खान हिच्या चांगलेच अंगाशी आले आहे. तिच्या विरोधात पालिकेने केलेल्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
पालिकेच्या के/पश्चिम विभागातील आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात गाैहरविरोधात तक्रार दाखल केली. कोरोनाची बाधा झाल्याची पूर्ण कल्पना असूनही ती सार्वजनिक परिसरात निष्काळजीने वावरत होती. एवढेच नव्हे तर यादरम्यान तिने चित्रिकरणामध्येही भाग घेतला. तिच्या या कृतीमुळे कोरोनाचा संसर्ग इतर व्यक्तींना होऊ शकतो, असे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला.
* वडिलांचे झाले काेराेनामुळे निधन
ओशिवरा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला. गाैहरच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर तिची काेराेना चाचणी करण्यात आली, ज्यात तीदेखील कोरोनाबाधित असल्याचे ११ मार्च रोजी समाेर आले. दरम्यान १४ मार्च, २०२१ रोजी पालिकेचे कर्मचारी तिच्या घरी समुपदेशनासाठी गेले. तेव्हा बराच वेळ तिने दरवाजा उघडला नाही. बरीच समजूत काढल्यावर तिने दार उघडले आणि तिच्या हातावर क्वॉरंटाईनचा शिक्का मारण्यात आला.
-----------------