मनोज गडनीसमुंबई : लम्हा, हॅलो ब्रदर, इक अजनबी, प्यार किया तो डरना क्या अशा सिनेमांची निर्मिती करणारे चित्रपट निर्माते गुनीत वालिया (बंटी), जसप्रीत वालिया यांनी लम्हा सिनेमासाठी आयडीबीआय बँकेकडून कर्ज घेत बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वालियांचे चार्टर्ड अकाऊंटंट स्टॅनी सलढाणा यांनी बँकेकडून कर्ज मिळावे, म्हणून बनावट प्रमाणपत्रे दिल्याप्रकरणी त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बँकेने दिलेल्या लेखी तक्रारीवरून सीबीआयने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
जून २००८ मध्ये अभिनेता संजय दत्त, बिपाशा बासू, कुणाल कपूर अशी स्टारकास्ट असलेल्या लम्हा सिनेमाची निर्मिती करण्यासाठी वालिया यांच्या जी. एस. एन्टरटेनमेंट कंपनीने आयडीबीआय बँकेकडून परदेशी चलनात १० कोटी रुपयांचे कर्ज घेतले तर ४ कोटी ९५ लाख रुपयांचे मुदतकर्ज घेतले होते.
हा चित्रपट मे २००९ मध्ये प्रदर्शित होणे अपेक्षित होते. मात्र, त्याला बराच विलंब झाला. या चित्रपटामध्ये बँकेचे पैसे अडकले असल्यामुळे बँकेनेच पीव्हीआर समूहाशी संपर्क करत सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. बँकेने दिलेल्या कर्जासाठी निश्चित करण्यात आलेल्या अटी व शर्तींचे कंपनीने पालन न केल्यामुळे बँकेने कंपनीचे फॉरेन्सिक ऑडिट केले. यामधून अनेक धक्कादायक गोष्टी बँकेच्या निदर्शनास आल्या.
गुंतवले केवळ ८८ लाख रुपये
- सिनेमाच्या निर्मितीचा खर्च २९ कोटी रुपयांच्या आसपास होता. यापैकी १४ कोटी ९५ लाख रुपये वालिया यांनी गुंतवणे अपेक्षित होते. हे पैसे वालिया यांनी गुंतवले असे स्टॅनी सलढाणा याने प्रमाणित करून दिले. याच्या आधारावर बँकेने निर्मात्याला पैसे दिले. मात्र, प्रत्यक्षात १४ कोटी रुपयांच्या ऐवजी वालिया याने केवळ ८८ लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचे दिसून आले.
- तसेच, ज्या बँकेद्वारे हे व्यवहार होणे अपेक्षित होते त्याऐवजी अन्य बँकेतून हे व्यवहार झाल्याचे दिसले. या सिनेमाला अधिकाधिक पैसे मिळावेत म्हणून सिनेमाच्या निर्मितीचा खर्च देखील फुगवून दाखवण्यात आल्याचा आरोप आहे.
- निर्मात्याला आयडीबीआय बँकेकडून कर्जापोटी जी रक्कम मिळाली त्यातील पैसे निर्मात्याने अन्य बँकेचे कर्ज फेडण्यासाठी वापरले. तसेच काही पैसे निर्मात्याच्याच अन्य खात्यात वळवून तेच पैसे निर्मात्याचा लम्हा सिनेमातील आर्थिक सहभाग यापोटी दाखवण्यात आले, असा ठपका ठेवण्यात आला आहे.
- फॉरेन्सिक ऑडिट करतेवेळी कंपनीला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वारंवार विचारणा केली. मात्र, कंपनीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. यानंतर निर्मात्याच्या कंपनीचे खाते ३१ मार्च २०२१ रोजी फ्रॉड खाते म्हणून घोषित करण्यात आले.