बनावट डॉक्टर पदवी प्रकरण : वांद्रे पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चित्रपट निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांना मंगळवारी वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून बनावट पदवी मिळवून त्याद्वारे रुग्णालयात नोकरी मिळवल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. समाजसेविका गुरुदीप कौर यांच्या तक्रारीवरून २६ मे रोजी पाटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कौर यांनी केलेल्या आरोपानुसार, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांच्या घरी आलेल्या निनावी लिफाफ्यात कागदपत्रे मिळून आली. त्यात पाटकर यांच्या विविध कागदपत्रांचा समावेश होता. त्यातूनच पाटकर यांनी, कानपूर विद्यापीठाच्या नावाने क्लिनिकल सायकॉलॉजिस्टची बनावट पदवी मिळवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कानपूर विद्यापीठातील छत्रपती शाहूजी महाराज विश्व विद्यालय येथून २००९ साली नमूद विषयात पीएच.डी. केल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून घेतले. याच प्रमाणपत्राच्या आधारे लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. स्वतःला डॉक्टर असल्याचे भासवून सर्वसामान्य जनतेची फसवणूक केल्याचे कौर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार मंगळवारी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. बुधवारी पाटकर यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाळकडू’ या चित्रपटाच्या त्या निर्मात्या आहेत.
.....
संजय राऊतांवर केले होते आरोप
डॉ. स्वप्ना पाटकर यांनी ३० एप्रिल रोजी ट्विटरद्वारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते. पाटकर यांनी केलेल्या आरोपात, संजय राऊत गेल्या आठ वर्षांपासून शिवसेना पक्षातील त्यांचे स्थान आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत मला धमक्या आणि शिवीगाळ करत आहेत. इतकेच नाही तर माझे कुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईक यांनाही ते त्रास देत आहेत. मला विनाकारण पोलीस ठाण्यात बोलावण्यात येत आहे. यामुळे मी खूपच त्रस्त झाले आहे. याबरोबरच पाटकर यांनी दोन पानांची पत्र लिहून पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक नेतेमंडळींना टॅग केले आहे. यावेळी केलेल्या ट्वीटमध्ये पाटकर यांनी कोणी आपल्याला मारून टाकण्याआधी न्याय मिळावा, अशी मागणी सर्वांकडे केली आहे.